अडचणीतील दूध महासंघाच्या नेत्यांकडून ‘गोकुळ’ सक्षम करण्याची भाषा!

 राज्यातील सर्वात मोठा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणून गोकुळची ओळख आहे.कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्य़ातील तमाम नेत्यांची लगबग उडाली असताना त्यामध्ये  कोणीही मागे राहिलेले दिसत नाही.  अगदी स्वत:चे दूध संघ असणारे नेतेही या स्पर्धेत मागे  नाहीत. त्यामध्ये आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार यांचा समावेश आहे. त्यातील अनेकांनी आपले दूध संघ अन्य खाजगी संघांना चालवायला दिले असताना आता त्यांची नजर ‘गोकुळ’वर असून हा संघ सक्षम करण्याची ते भाषा करीत आहेत. हा विरोधाभास जिल्ह्य़ाच्या राजकारणात चर्चेचा मुद्दा ठरला आहे.राज्यातील सर्वात मोठा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणून गोकुळची ओळख आहे. बारा लाख लिटर दूध संकलन आणि अडीच हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेला गोकुळ ही दुग्धव्यवसायातील सर्वात मोठी नाममुद्रा आहे. यामुळे या दूध संघाचे संचालक होऊन मलईदार कारभार करण्याची अतीव इच्छा कोल्हापूर जिल्ह्य़ातील नेत्यांमध्ये आहे. ती प्रत्येक निवडणुकीत दिसतेच दिसते. उलट या वेळी या स्पर्धेत स्वत:च्या नेतृत्वाखाली दूध संघ असलेले नेतेही संचालक मंडळात स्वत:चा वा कुटुंबातील सदस्य यांचा समावेश होण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.वारणा संघही स्पर्धेत जिल्ह्य़ात गोकुळपाठोपाठ सर्वात मोठा दूध संघ म्हणून वारणा दूध संघाची ओळख आहे. सुमारे आठ लाख लिटर दूध संकलन असलेल्या वारणाचे दुधाबरोबरच दुग्ध उत्पादने नामांकित आहेत. याचे नेते, जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी राज्यात भाजपला पाठिंबा दिला आहे. पण गोकुळसाठी त्यांनी विरोधकांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्याच्या मोबदल्यात माजी मंत्री कोरे  यांना मानणाऱ्या दोघांना उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. या राजकारणामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविणाऱ्या विरोधकांपासून शिवसेनेचे माजी आमदार सत्यजीत पाटील दुरावले असून ते सत्तारूढ गटाच्या छावणीत पुन्हा परतले आहेत.


कागलचे सारे नेते शर्यतीत

खासदार संजय मंडलिक यांचा श्री महालक्ष्मी सहकारी दूध संघ आहे. दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी स्थापन केलेला हा संघ आता पालकरवाडी येथील एका खाजगी संस्थेकडे चालवण्यासाठी देण्यात आला आहे. खासदार संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांना विरोधी आघाडीतून उमेदवारी जवळपास निश्चित आहे. अशीच कथा कागल तालुक्यातील अन्य दोन नेत्यांच्या बाबतीतही आहे.  शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांचे सुपुत्र, जिल्हा परिषद सदस्य अंबरीश हे गोकुळचे संचालक विरोधी  आघाडीतून झाले, पण ते सत्तारूढ गटात सामावले गेले.  समृद्धी दूध संघ विमल कंपनीस चालवण्यास देण्यात आला आहे. सत्तारूढ गटाने ‘संचालक मंडळात राजे गटाला समाविष्ट केले नाही; तर वेगळा विचार करावा लागेल’, असा इशारा समरजीतसिंह राजे घाटगे यांच्या गटाने एका मेळाव्यात दिला आहे. घाटगे यांच्याकडे भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. त्यांचा शाहू कारखाना इतका यशस्वी शाहू दूध संघ ठरला नाही. सध्या हा संघ पंजाब सिंध या कंपनीस चालवण्यास देण्यात आला आहे.


शेतकरी नेते याच माळेत

माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर सम्राट यांच्यावर टीका करतानाच दूध सम्राटांनाही धारेवर धरले होते. ‘पांढऱ्या दुधातील काळे बोके’ अशी जोरदार टीका करून दूध संघ कसा चालवायचा ते दाखवून देतो, या ईर्षेने त्यांनी स्वाभिमानी दूध संघ शिरोळ तालुक्यात सुरू केला आहे. पण दहा वर्षांंनंतरही हा दूध संघ एक लाख लिटरचे दूध संकलनही करू शकला नाही. जिल्ह्य़ातील अन्य दूध संघ पेक्षा अधिक रक्कम दुधाला देण्याची घोषणा त्यांनी केली होती. पण अजूनही ते गोकुळ दूध संघापेक्षाही अधिक दर देऊ शकले नाहीत. आता गोकुळच्या निवडणुकीतही ते धड ना सत्तारूढ गटाकडे आहेत ना विरोधी गटात. तरीही ‘आपल्या गटाचा विचार झाला नाही तर ताकद दाखवून देऊ’, असा इशारा शेट्टी यांना द्यावा लागला आहे. हे चित्र पाहता जिल्ह्य़ातील जनसुराज्य, शिवसेना, भाजप स्वाभिमानी अशा विविध पक्षातील दूध संघाच्या नेत्यांना स्वत:चा दूध संघ सांभाळण्यापेक्षा गोकुळमध्ये संचालकपद म्हणून जाण्याची धडपड आणि स्पर्धा जाणवत आहे. यातूनच गोकुळचे संचालकपद किती मलईदार आहे याची प्रचीती येत आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area