एअर एशियाच्या बेंगळुरू-दिल्ली विमानातच प्रवाशाने गोंधळ घातला. क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केले. त्यानंतर या प्रवाशाने आपल्या अंगावरील कपडे उतरवले. दिल्ली विमानतळावर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नवी दिल्ली: बेंगळुरूहून दिल्लीला येणाऱ्या एअर एशियाच्या विमानात धक्कादायक प्रकार घडला आहे. विमानातील प्रवासी अचानक क्रू मेंबरसोबत गैरवर्तन करू लागला. त्याने आपल्या अंगावरील कपडे उतरवले. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळात सुरू झालेल्या या प्रकारामुळे विमानातील इतर प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरवल्यानंतर संबंधित प्रवाशाला विमानतळ अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.
बेंगळुरूहून दिल्लीसाठी या विमानाने उड्डाण भरले होते. त्याचवेळी विमानातील एका प्रवाशाने अचानक आपल्या अंगावरील कपडे उतरवले. विमानातील क्रू मेंबरसोबत तो गैरवर्तन करू लागला. इतर प्रवाशांनी इमर्जन्सी अलार्म वाजवला. क्रू मेंबर आल्यानंतर त्यांच्यासोबतही गैरवर्तन केले. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी हा प्रकार घडला. विमानातील प्रवाशाने केबिन क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केले. क्रू मेंबरने शांत बसण्यास सांगितले. त्यावर प्रवाशाने अंगावरील कपडे काढले आणि गोंधळ घालण्यास सुरुवात केली. केबिन क्रू मेंबरने अखेर पायलटला या घटनेची सूचना दिली.
पायलटने दिल्ली विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि सीआयएसएफ, दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली. या प्रवाशाला पुन्हा कपडे घालण्यास सांगितले. त्याने कपडे घातले. परंतु, पुन्हा त्याने तोच प्रकार केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एअर एशियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, दिल्ली विमानतळावर उतरताच प्रवाशाला अटक करण्यात आली. बेंगळुरू-दिल्ली विमानात ६ एप्रिलला ही घटना घडली. केबिन क्रूसोबत प्रवाशाने गैरवर्तन केले. त्यांनी प्रवाशाला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला. दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.