सचिन वाझे प्रकरण : 'त्या' महिलेची १३ तास चौकशी

 मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या बंगल्याजवळ गाडीत स्फोटके ठेवण्याआधी सचिन वाझेंसह जी महिला दिसली होती, तिची राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) १३ तास चौकशी केली.मुंबई:  मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या बंगल्याजवळ गाडीत स्फोटके ठेवण्याआधी सचिन वाझेंसह जी महिला दिसली होती, तिची राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) १३ तास चौकशी केली. या महिलेच्या माध्यमातून वाझे हे राजकीय नेत्यांच्या संपर्कात होते, असा 'एनआयए'चा संशय आहे.

सचिन वाझे यांनी दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये १०० दिवसांसाठी एक खोली बूक केली होती. मुख्य म्हणजे त्या खोलीसाठीचे भाडे एका व्यापाऱ्याने भरले होते. अंबानी यांच्या घराजवळ गाडीत स्फोटके ठेवण्याआधी या हॉटेलमधून बाहेर पडताना वाझे एका आलिशान गाडीत दिसले होते. त्यावेळी वाझे स्वत:च गाडी चालवत होते, तर समोरच्या सीटवर एक महिला होती. ही महिला नेमकी कोण? याचा एनआयएकडून जोमाने तपास सुरू होता. त्यात शुक्रवारी एनआयएला काही प्रमाणात माहिती काढण्यात यश आले.


या महिलेला एनआयएने गुरुवारी रात्री मिरा-भाईंदर येथून ताब्यात घेतले. त्या महिलेची गुरुवार रात्रीपासून शुक्रवार दुपारपर्यंत १३ तास कसून चौकशी केली. वाझे अशाप्रकारच्या गुन्ह्यांसंबंधी काही राजकीय नेत्यांच्या संपर्कात होते. ही महिला ते राजकीय नेते व वाझे यांच्यातील दुवा होती, असा संशय तिच्या चौकशीतून तसेच तिच्या मिरा-भाईंदर येथील फ्लॅटवर सापडलेल्या दस्तावेजांवरून बळावला आहे. याबाबत आणखी तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.


आठ सीमकार्डचा सुरू आहे तपास

संबंधित गुन्ह्यासाठी वाझे यांनी वापरलेल्या आठ सीमकार्डचादेखील एनआयए तपास करीत आहे. हे सीमकार्ड व त्यासंबंधीची कागदपत्रे एनआयएच्या पथकाने बाबुलनाथ परिसरातून ताब्यात घेतली. याआधी राज्य एटीएसने अटक केलेला क्रिकेट बुकी नरेश गोर याने वाझे यांना गुजरातहून ही सीमकार्ड उपलब्ध करून दिली होती व पुढे ती निलंबित पोलिस अधिकारी विनायक शिंदेला दिली होती, असेही तपासात समोर आले आहे. परंतु आता हा तपास प्रामुख्याने त्या महिलेभोवती असेल, असे एनआयएच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area