प. बंगालातील निवडणुकांचे मेळे पंतप्रधान थांबवायला तयार नाहीत, तेथे कुंभमेळय़ातील साधू-संतांना तरी दोष का द्यायचा? असा सवाल शिवसेनेने केला आहे. (Shivsena criticism Modi government)
मुंबई :
“राजकारणाचा डोस कमी करून केंद्राने कोरोना युद्धावर लक्ष ठेवले असते तर परिस्थिती नक्कीच नियंत्रणाखाली आली असती. कोरोनाच्या पहिल्या लाटेस चीन जबाबदार असेलही, पण आज जे दुसरे तुफान उठले आहे त्यास सर्वस्वी जबाबदार चीन नसून निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारच आहे. ज्या राज्यांत निवडणुका झाल्या किंवा होत आहेत तेथून किमान 500 पट वेगाने कोरोनाचा प्रसार देशभरात झाला. त्यामुळे कोरोना ही नैसर्गिक आपत्ती मान्य केली तरी या नैसर्गिक आपत्तीचा सूत्रधार राजकीय मनुष्यप्राणीच आहे,” असा घणाघात शिवसेनेनं केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून देशभरातील कोरोना स्थितीवरुन केंद्र सरकारवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. (Shivsena Saamana Editorial criticism PM Modi government on Corona)
कुंभमेळय़ातील साधू-संतांना तरी दोष का द्यायचा?
सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. हरिद्वार येथील कुंभमेळय़ास मध्य प्रदेशातून आलेले निर्वाणी आखाडय़ाचे महामंडलेश्वर कपिल देव यांचेही कोरोना संसर्गामुळेच निधन झाल्याची बातमी धक्कादायक आहे. कोरोनाचा कहर हा असा सुरूच आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांवर गेली, पण देशात निवडणुकांचे मेळे आणि धार्मिक कुंभमेळे काही थांबायला तयार नाहीत. लाखो भाविक हरिद्वारला कुंभमेळय़ासाठी जमले. त्यांनी गंगेत शाहीस्नान केले. त्यातून कोरोनाचा संसर्ग देशभरात झाला आहे. प. बंगालातील निवडणुकांचे मेळे पंतप्रधान थांबवायला तयार नाहीत, तेथे कुंभमेळय़ातील साधू-संतांना तरी दोष का द्यायचा? असा सवाल शिवसेनेने केला आहे.
निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारच जबाबदार
कोरोनाची आपत्ती केंद्र सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही. प. बंगालातूनही ‘कोरोना’ची भेट घेऊन भाजप कार्यकर्ते आपापल्या राज्यांत परत येत आहेत. कोरोनाच्या पहिल्या संकटाचे खापर सरकारने चीनवर फोडले. हे सर्व चीनच्या वुहान प्रांतातील मासळी बाजारातून पसरले. त्यामुळे जगाच्या वाताहतीस फक्त चीन आणि चीनच जबाबदार आहे हे सगळय़ांनीच ठरवून टाकले. पण आता चीन कोठे आहे? चीनची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. चीनमधून कोरोना नष्ट झाला की काय ते सांगता येत नाही. पण चीनमधील कोरोनाच्या बातम्या येत नाहीत. भारतातील कोरोनाच्या पहिल्या लाटेस चीन जबाबदार असेलही, पण आज जे दुसरे तुफान उठले आहे त्यास सर्वस्वी जबाबदार चीन नसून निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारच आहे, असेही यात म्हटलं आहे.