वाझे प्रकरणात आमची नाहक बदनामी, संजय राऊतांना समज द्या; काँग्रेस ठाकरे सरकारवर नाराज?

 हे प्रकरण सरकारने व्यवस्थितपणे हाताळले नाही. त्यामुळे आमच्यावरही विनाकारण शिंतोडे उडाले. | Sachin Waze Congress Thackeray govt
मुंबई: अंबानी स्फोटक प्रकरणात पोलीस दलापर्यंत पोहोचलेल्या धाग्यादोऱ्यांमुळे झालेली नाचक्की आणि कोरोना परिस्थिती हाताळताना अगोदरच मेटाकुटीस आलेल्या ठाकरे सरकारला (Thackeray govt) आता काँग्रेसने आणखी एक इशारा दिला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना स्पष्टपणे बोलून दाखवल्याची माहिती, सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली आहे. (Congress leaders warns Thackeray govt)


या माहितीनुसार, काँग्रेसने सचिन वाझे प्रकरणात आमची नाहक बदनामी झाली, असे मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे समजते. हे प्रकरण सरकारने व्यवस्थितपणे हाताळले नाही. त्यामुळे आमच्यावरही विनाकारण शिंतोडे उडाले, असा नाराजीचा सूर काँग्रेसच्या नेत्यांनी लावला.


तर दुसरीकडे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) अध्यक्षपदासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून सुरु लॉबिंगविषयीही काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. संजय राऊत यांनी यूपीएचे अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याऐवजी शरद पवार यांच्याकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी लावून धरली आहे. या मुद्द्यावरुन गेल्या काही दिवसांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमकीही झाल्या आहेत. नाना पटोले यांनी आम्ही हा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडणार असल्याचेही सांगितले होते. त्यामुळे आता शिवसेनेने संजय राऊत यांनी समज द्यावी, अशी मागणीही काँग्रेस नेत्यांनी केल्याचे समजते.


लक्षात ठेवा, ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर, नाना पटोलेंचा शिवसेनेला रोखठोक इशारा

गेल्या काही दिवसांत काँग्रेसने ठाकरे सरकारला दोनदा निर्वाणीचा इशारा दिला आहे. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली 10 वर्षे मनमोहन सिंग यांचे केंद्रात सरकार होते. त्यात शरद पवार मंत्री होते हे विसरता कामा नये. काँग्रेस नेत्यांवर केली जाणारी टीका पक्षाकडून सहन केली जाणार नाही. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या लक्षात ही बाब आणून देणार आहोत. काँग्रेसमुळे सरकार आहे, आम्ही म्हणजे सरकार नाही, हे लक्षात आणून देण्याची वेळ आली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area