थुंकल्यावरून हटकल्याने खुनाचा प्रयत्न

 रस्त्यावर थुंकणाऱ्याला हटकल्याचा राग आल्याने दोघांनी मिळून एकाला जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचा प्रकार सिंहगड रस्त्यावर माणिकबाग येथे बुधवारी घडला.
पुणे: रस्त्यावर थुंकणाऱ्याला हटकल्याचा राग आल्याने दोघांनी मिळून एकाला जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचा प्रकार सिंहगड रस्त्यावर माणिकबाग येथे बुधवारी घडला. या प्रकारानंतर दोन्ही आरोपींनी तेथील ऑफिसची आणि वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी हनुमान ज्ञानोबा मोरे (वय २९, रा. कात्रज) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून करण अर्जुन दळवी (वय १९) आणि हनुमान वैजनाथ जुंझारे (वय २१, दोघेही रा. वडगाव) यांना अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोरे माणिकबाग येथील आय. बी. ऑटोमेशन इंजिनीअरिंग प्रोजेक्ट प्रा. लि. येथे नोकरीस आहेत.

फिर्यादी त्यांच्या कंपनीच्या ऑफिसबाहेर पाणी पिण्यासाठी आले होते. त्या वेळी दळवी ऑफिसच्या पायरीसमोर थुंकला. यामुळे फिर्यादीने त्यास हटकले. 'इथे थुंकण्याची जागा नाही, तू इथे का थुंकलास? सध्या करोनाचा काळ चालू आहे. त्यामुळे संसर्ग होऊ शकतो,' असे फिर्यादी दळवीला म्हणाले. त्यावर आरोपीने 'तू मला ओळखत नाहीस काय, तू कोणाशी बोलतोय, तुला कळत नाही का, मी करण दळवी सिंहगड रोडचा भाई आहे. तुला संपवून टाकीन,' अशी धमकी देऊन फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच, फिर्यादीच्या डोक्यात दगड मारण्याचा प्रयत्न केला. साथीदाराच्या मदतीने ऑफिसचे नुकसान केले. रस्त्यावर उभ्या केलेल्या सहा वाहनांच्या काचा फोडल्या.


'भाईं'ना चाप लावण्याची गरज

रस्तोरस्ती क्षुल्लक कारणावरून नागरिकांना मारहाण करण्यापासून जीवघेणे हल्ले करण्यापर्यंतचे प्रकार शहरात दररोज घडत असून, पुणे पोलिसांसमोर या गुन्ह्यांना चाप लावण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले झाले आहे. 'मटा'नेही सातत्याने या विषयावर बातम्यांद्वारे प्रकाशझोत टाकला आहे. येत्या काळात या 'भाईं'ना चाप लावण्यासाठी पोलिस प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागणार आहेत.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area