शेतावरून घरी परतत होती विधवा महिला, दुचाकीस्वाराने लिफ्ट दिली अन्

 उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात एका विधवा महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिला शेतावरून घरी परतत होती. त्याचवेळी एकाने तिला लिफ्ट दिली. त्यानंतर एका शेतात नेऊन बलात्कार केला.
लखनऊ : शेतावरून काम करून संध्याकाळी घरी परतणाऱ्या विधवा महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने निर्जन स्थळी नेऊन तिथे तिच्यावर

बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील कबरई पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली.


मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी उशिरापर्यंत महिला घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही वेळाने महिला एका शेतात आढळून आली. त्याचवेळी आरोपीही तिथेच होता. महिलेने सर्व हकिकत तिच्या कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर घरच्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.


कबरई पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही पीडित महिला राहते. तिच्या पतीचे आठ वर्षांपूर्वीच आजाराने निधन झाले आहे. तेव्हापासून कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर पडली. शेती करून त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून आपल्या दोन मुली आणि एका मुलाचे पालनपोषण करते. बुधवारी संध्याकाळी महिला शेतावरून घरी परतत होती. त्याचवेळी रस्त्यात तिला एका दुचाकीस्वाराने लिफ्ट देतो अशी बतावणी करून दुचाकीवर बसवले. त्यानंतर निर्जन ठिकाणी नेले. तिथे शेतात तिच्यावर बलात्कार केला.


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर त्याच रात्री उशिरा आरोपीचे कुटुंबीय तिच्या घरी आले. तिच्या कुटुंबीयांना मारहाण केली. तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले, असा आरोप पीडितेने केला आहे. जिल्हा रुग्णालयात महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area