लग्नाची खरेदी अडकली दुकानांत

 बोहल्यावर चढणाऱ्या तरुण-तरुणींनी लग्नासाठी खरेदी केलेले कपडे 'फिनिशिंग', 'पॉलिश'साठी दुकानदारांकडे दिले असल्याने, ते कपडे आता अडकून पडले आहेत.


पुणे: बोहल्यावर चढणाऱ्या तरुण-तरुणींनी लग्नासाठी खरेदी केलेले कपडे 'फिनिशिंग', 'पॉलिश'साठी दुकानदारांकडे दिले असल्याने, ते कपडे आता अडकून पडले आहेत. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घातलेल्या निर्बंधांनुसार कपड्यांची दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे हे कपडे केव्हा मिळणार, त्यांची 'फिनिशिंग', 'पॉलिश' व्यवस्थित होणार का, अशी चिंता आता संबंधितांना सतावते आहे.

एप्रिल, मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त आहेत; तसेच वर्षाच्या सुरुवातीला करोनाचा संसर्ग कमी झाला होता. त्यामुळे अनेकांनी एप्रिल, मे महिन्यात लग्नकार्य निश्चित केली होती. त्यानुसार अनेकांनी आहेराच्या देण्या-घेण्याच्या कपड्यांपासून वधू-वरांच्या कपड्यांपर्यंत खरेदी केली आहे. शहरात बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, रविवार पेठेसह कॅम्प परिसरात कपड्यांची मोठी दुकाने आहेत. उपनगरातही कपड्यांची मोठी दुकाने आहेत. मार्च अखेरीस या दुकानांत कपड्यांची मोठी खरेदी-विक्री झाली.

वधू-वराचे कपडे, महागड्या साड्यांच्या विक्रीनंतर दुकानदाराकडून त्या कपड्यांचे 'फिनिशिंग' करून दिले जाते. त्यात साड्यांचे फॉल-पिको, इस्त्री आदींचा समावेश आहे, तर पुरुषांचे कपडे अल्टर करून देण्याची मागणी असते. त्यानुसार खरेदीनंतर कपडे 'फिनिशिंग'साठी दुकानातच सोडले जातात. काही ठरावीक मुदतीत किंवा ग्राहकाच्या मागणीनुसार निश्चित मुदतीत ते कपडे परत केले जातात. अशा प्रकारे मार्चअखेरीस खरेदी केलेले अनेक ग्राहकांचे कपडे दुकानदारांकडेच पडून आहेत.


दुकाने उघडल्यास कारवाईची भीती

नागरिकांच्या कपड्यांवर आवश्यकतेनुसार काम करण्यासाठी कारागीरांना दुकानात बोलावणे गरजेचे आहे. कपड्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना ते कपडे देण्यासाठी दुकान उघडावे लागेल. मात्र, या दोन्ही गोष्टी करताना व्यावसायिकांना पोलिसांच्या कारवाईची भीती आहे. अनेक दुकानदारांनी तीन एप्रिललाच नागरिकांना फोन करून कपडे दिले आहेत. मात्र, अद्यापही अनेक दुकानांत कपडे अडकून पडल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली.


'साड्या मिळाल्या; वराचे कपडे बाकी'

'आम्ही ३०, ३१ मार्चला वधूच्या साड्यांची खरेदी केली. दुकानदार १० दिवसांत साड्या पॉलिश करून देणार होते. मात्र, तीन एप्रिलला दुकानातून फोन आला, की साड्या घ्यायला आजच या, नाहीतर ३० एप्रिलनंतर मिळतील. त्यामुळे आम्ही दुकानात जाऊन साड्या घेतल्या. मात्र, दोन दिवसांत साड्यांचे 'पॉलिश' झाले का, ते व्यवस्थित केले आहे का, असे प्रश्न आम्हाला पडले आहेत,' अशी भावना अपूर्वा कुलकर्णी यांनी 'मटा'कडे व्यक्त केली. वधूच्या साड्या मिळाल्या असल्या; तरीही वराचे कपडे अद्याप मिळाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area