शारीरिक-मानसिक जाचाला कंटाळून सावत्र मुलीकडून लाकडी दांडक्याने बापाची हत्या

 नागपूर: सततच्या शारीरिक आणि मानसिक जाचाला कंटाळून नागपूरमध्ये एका सावत्र मुलीने आपल्या वडिलांची हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. हिंगणा तालुक्यातील सावळी गावात ही घटना घडली. ज्ञानेश्वर दामाजी गडकर (60) असे मृत इसमाचे नाव आहे. (17 year old girl killed stepfather in Nagpur)

ज्ञानेश्वर गडकर यांच्या सावत्र मुलीने पोलिसांसमोर हत्येची कबुली दिली आहे. ही मुलगी अल्पवयीन आहे. पीडित मुलीने लाकडी दांड्याने ज्ञानेश्वरच्या तोंडावर आणि डोक्यावर वार केले. ज्यामध्ये ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला. सध्या हिंगणा पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.


त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल

ज्ञानेश्वरने 15 वर्षांपूर्वी वंदना नावाच्या महिलेशी लग्न केले होते. वंदनासुद्धा विवाहित होती. तिला पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे. काही दिवस सावळी येथे एकत्रित राहिल्यानंतर ज्ञानेश्वर वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील खापरी येथे एकटाच राहायला गेला होता. त्यानंतर अधूनमधून तो सावळी येथे वंदनाकडे येत होता. येथे आल्यानंतर तो पत्नी वंदना आणि सावत्र मुलीला सतत त्रास देत असे.


सोमवारी सकाळी 11 वाजता ज्ञानेश्वर असाच दारू पिऊन घरी आला. दारूच्या नशेत असलेल्या ज्ञानेश्वरने मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली. यावरुन दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यावेळी राग अनावर झाल्याने पीडित मुलीने लाकडी दांडक्याने ज्ञानेश्वरच्या तोंडावर आणि डोक्यावर मारा केला. ज्यामध्ये ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area