रत्नागिरी शहराजवळील काळबादेवी परिसरात पांढऱ्या कावळ्याचे दर्शन

रत्नागिरी : निसर्गामध्ये अनेक बदल आपण पाहत असतो. असाच एक निसर्गातील बदल रत्नागिरी शहराजवळील काळबादेवी गावात पहावयास मिळाली आहे.

या गावात पांढऱ्या कावळ्याचे दर्शन झाले आहे. शेखर शेट्ये यांच्या दृष्टीस त्यांच्या घरासमोर चक्क पांढरा कावळा आला आणि त्यांना अशा पांढऱ्याशुभ्र कावळ्याची छबी टिपण्याचा मोह आवरता आला नाही. विशेष म्हणजे गेले चार दिवस शेट्ये यांच्या घराजवळ पांढऱ्या कावळ्याची हजेरी हा गावात चर्चेचा विषय ठरला होता.

शेखर शेट्ये यांच्या घराजवळील परिसरात अनेक पक्षी येतात. ते नेहमीप्रमाणे सकाळी कोंबड्यांना खाणं घालत असताना काही कावळे तिथे आले. त्यात एक पांढरा पक्षी दिसला. दाणे टिपणारा तो पक्षी कबुतर असावा असे प्रथम शेट्ये यांना वाटले. थोडे कुतूहलाने त्यांनी त्याचे निरीक्षण केल्यावर तो पांढरा पक्षी कबूतर नसून कावळाच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या पांढऱ्या पक्षाची चोच, डोळा शरीराची ठेवण ही आपल्याला नेहमी दिसणाऱ्या कावळ्यासारखीच होती. थोडा वेळ थांबून त्यांनी आवाज ऐकला. या पांढऱ्या पक्षाने कावळ्याप्रमाणे काव काव केलं. यामुळे शेट्येंना आश्चर्यच वाटले. यावेळी काळा आणि पांढरा दोन्ही रंगांचे कावळे एकत्र वावरताना पाहून सामंजस्याचा संदेश मिळाला, असे निसर्गप्रेमी शेखर शेट्ये सांगतात.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area