मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, दक्षिण मुंबई, उपनगरात पावसाच्या सरी

 

मुंबई : अरबी समुद्रात ‘तौत्के’ चक्रीवादळ घोंघावत आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत सोसाट्याचा वारा सुटणार असून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरात पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सध्या मुंबईत अनेक ठिकाणी काळ्या ढगांची  गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Tauktae Cyclone Effect rains with winds gusting in mumbai)


मुंबईत काल रात्रीपासून प्रचंड गार वारा सुटला होता. त्यानंतर पहाटेच्या सुमारास दक्षिण मुंबईसह उपनगरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. सद्यस्थितीत मुंबईत काळे ढग दाटून आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना सूर्यदेवाचे दर्शन होण्याची शक्यता कमी आहे.


कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी

अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले आहे. त्यामुळे येत्या 12 तासात चक्रीवादळ अधिक सक्रीय होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच काही भागात ऑरेंज झोनही जारी करण्यात आला आहे.


या चक्रीवादळाची तीव्रता दुपारनंतर वाढणार आहे. सध्या अनेक ठिकाणी सोसायट्याचा वारा सुटला आहे. अनेक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या ठिकाणीही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


चक्रीवादळाचे मुंबई, कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात काय परिणाम?

चक्रीवादळाच्या काळात महाराष्ट्र किनारपट्टीवर 15 ते 17 मे दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर 14 मे रोजी कोकण, गोवा यांसह तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुटेल. तर काही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातदेखील अशीच अवस्था असेल.


तर 15 मे रोजी कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहील. तसेच मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. या चक्रीवादळादरम्यान समुद्र खवळलेला राहील. वाऱ्याचा वेगही प्रचंड असेल.


तसेच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल. घाट विभागात मुसळधार पाऊस पडेल. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.


चक्रीवादळाचे परिणाम  

  1. मुंबई, ठाणे, पालघर – पावसाच्या हलक्या सरी 

  2. कोकण –  मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा 

  3. रायगड – मोठा पाऊस 

  4. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा- तुरळक पाऊस 

  5. विदर्भ – मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area