कोरोना नियम मोडल्याने दीड लाखांच्या खंडणीची मागणी, BMC च्या चौघा क्लीन-अप मार्शलना अटक

मुंबई : दीड लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी मुंबईत एमआयडीसी पोलिसांनी मुंबई महापालिकेच्या चौघा क्लीन-अप मार्शलना अटक केली आहे. कोरोनासंबंधी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून हे क्लीन-अप मार्शल खंडणीच्या स्वरुपात पैशांची मागणी करत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. (Mumbai Four BMC Cleanup Marshals held for extortion on pretext of pandemic violations)


मुंबईसह महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्यामुळे आणि नागरिक नियमांचे पालन करत नसल्यामुळे सरकारच्या वतीने 31 मेपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कंत्राटी पद्धतीने क्लीन-अप मार्शलची नेमणूक मुंबईतील प्रभागांमध्ये करण्यात आली आहे.


अंधेरीतील कंपनी मालकाकडे खंडणीची मागणी

कोरोनासंबंधी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून हे क्लीन-अप मार्शल खंडणीच्या स्वरुपात पैशांची मागणी करत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. अंधेरी पूर्वेला एमआयडीसी परिसरातील एका कंपनी मालकाकडून या क्लीन अप मार्शलली मास्क न घातल्याबद्दल आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दीड लाख रुपयांची खंडणी मागितली होती.


पुन्हा छापा मारुन खंडणीखोरी

कंपनी मालकाने 21 एप्रिल रोजी दीड लाखांऐवजी 20 हजार रुपयांची खंडणी दिली होती. मात्र आरोपीने काल संध्याकाळी पुन्हा त्याच कंपनीमध्ये छापा मारुन एक लाखांची खंडणी मागितली. कंपनी मालकाने या क्लीनअप मार्शलच्या विरोधात एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी पोलिसांनी 5 क्लीन-अप मार्शलच्या विरोधात गुन्हा नोंद करुन चौघा क्लीन-अप मार्शलना अटक केली आहे.


चौघांना अटक, एक जण पसार

एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेल्या क्लीनअप मार्शलमध्ये प्रमोद माने, विशाल सूर्यवंशी, दादासाहेब गोडसे, आकाश गायकवाड या चौघा आरोपींचा समावेश आहे. तर यातील एक आरोपी पसार झाला असून त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असताना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच यांनी आणखी कोणत्याही ठिकाणी अशाप्रकारे लूट केली आहे का, याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे, असे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area