Narendra Modi: “हॅलो, मी नरेंद्र मोदी बोलतोय”; देशाच्या पंतप्रधानांचा कॉल दिनेशच्या मोबाईलवर येतो तेव्हा…

उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील हसनपूर जमुआ गावातील रहिवासी दिनेश कुमार उपाध्याय यांना रविवारी मोबाईलवर कॉल आला. हॅलो, बोलल्यानंतर पलीकडून गंभीर आवाज ऐकायला मिळाला. मी नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) बोलतोय. तुम्ही कसे आहात? सुरुवातीला दिनेश उपाध्याय यांना विश्वासच बसला नाहीत की त्यांना देशाच्या पंतप्रधानांचा फोन आला आहे. १०-१५ सेकंद ते निशब्द झाले होते.

दिनेश उपाध्याय म्हणाले की, हा माझ्या जीवनातील सर्वात अविस्मरणीय क्षण आहे. जितक्या सहज आणि साध्या भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी संवाद साधला मला विश्वास बसला नाही. देशाच्या पंतप्रधानावर आम्हाला गर्व आहे. सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी माझ्या कुटुंबाची आणि मुलांच्या शिक्षणाबद्दल माहिती घेतली. कोविड १९ मुळे मुलांचे शिक्षण ऑनलाईन होतंय की नाही? ऑक्सिजन घेऊन जाता भीती वाटत नाही का? हॉस्पिटलमध्ये पोहचण्यास काही अडचण होत नाही ना? मुलांना खूप चांगलं शिक्षण द्या, तुमचं कार्य महत्त्वाचं आहे. कोविड काळात मोठी जबाबदारी सांभाळत आहात असं मोदी फोनवरून म्हणाले.

१५ वर्षापासून चालवतायेत टँकर

रविवारी सकाळी ७ च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आला तेव्हा दिनेश उपाध्याय गुजरातच्या पंचमहल परिसरात टँकर उभा करून चहा घेत होते. मध्यमवर्गीय कुटुंबातील दिनेशने शिक्षण पूर्ण करून मोठा भाऊ कमलेश उपाध्याय यांच्याकडे आले. कमलेश हे स्वत: ऑक्सिजन टँकर चालवण्याचं काम करतात. गावाकडे दिनेची पत्नी निर्मला, मुलगा आर्यन, मुलगी सोनी, प्रीती राहतात.

जवळपास ५ मिनिटांच्या संवादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनेश उपाध्याय करत असलेल्या कामाचं कौतुक केले. त्यांचा आत्मविश्वास वाढवला आणि दुसऱ्यांनाही त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यास सांगितले. देशाच्या पंतप्रधानांचा आलेला कॉल म्हणजे मी केलेल्या कामाचं बक्षिस असल्याचं दिनेश सांगतात. मागील १५-१७ वर्षापासून दिनेश ऑक्सिजन टँकर चालवत आहेत. याआधी मी करत असलेल्या कामाचं कोणाला महत्त्व नव्हतं. लोक सामान्य ड्रायव्हरप्रमाणे आमच्याशी वागत होते. वाहतूक कोंडीत अनेक तास ताटकळत राहावं लागत होते. परंतु आता लोकांना ऑक्सिजनचं महत्त्व पटलं आहे. वाहतूक कोंडीतही प्रशासनाच्या मदतीनं काही मिनिटांत आमचं वाहन पुढे जातं.

हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पोहचवल्यामुळे सन्मान मिळतो पण त्याहून अधिक आनंद आणि दिलासा मिळतो जेव्हा आपण आणलेल्या ऑक्सिजनमुळे कोणाचा तरी जीव वाचतो. रुग्णांचे नातेवाईक हात वर करून टाळ्या वाजवून आमचं कौतुक करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तुम्ही करत असलेलं काम कौतुकास्पद आहे. कुटुंबाची चिंता सोडून तुम्ही देश आणि समाजासाठी पुढे येऊन काम करत आहात. लाखो लोकांचे जीवन वाचवत आहात. कोरोना काळात तुमच्यावरील जबाबदारी वाढली आहे. निष्ठेने तुम्ही देशाची सेवा करत आहात असं मोदींनी दिनेश यांना सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area