1 जूनपासून आणखी 15 दिवस निर्बंध! रुग्णसंख्या कमी झालेल्या जिल्ह्यांत सवलत

 

राज्यात एप्रिलपासून लावण्यात आलेले कडक निर्बंध (restriction) शिथिल होणार की आणखी वाढणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात 1 जूननंतर पुढील 15 दिवस निर्बंध वाढणार असल्याचे संकेत दिले. रुग्णसंख्या घटलेल्या जिल्ह्यांत काही प्रमाणात सवलती दिल्या जातील, असेही सूतोवाच त्यांनी केले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील पॉझिटिव्ही रेट दहा टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर गो स्लो भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळेच 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधीकरिता निर्बंध (restriction) वाढवण्याचा विचार सुरू आहे.  ज्या जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाले तिथे काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल. मात्र निर्बंध शिथिल करण्याबाबतचा निर्णय हा स्थानिक प्रशासनाचा असेल, असे टोपे यांनी सांगितले.

म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर 131 रुग्णालयांमध्ये या आजारावर मोफत उपचार करण्यात येत आहेत. या आजारावरील इंजेक्शनचा तुटवडा आहे. त्यामुळे खासगी हॉस्पिटलमध्ये ती वेळेवर मिळत नाहीत. या इंजेक्शनचे नियंत्रण केंद्र सरकारकडे आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या झोळीत जेवढे इंजेक्शन टाकते त्याप्रमाणेच वाटप केले जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्ध्यात म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शन्सचे उत्पादन सुरू केल्याने अभिनंदन केले. त्यामुळे महाराष्ट्राला मोठय़ा प्रमाणावर इंजेक्शन्स मिळतील, असेही ते म्हणाले.

पुण्यात शनिवाररविवार बंधने काढणार

पुणे जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा-सुविधांवर असलेली बंधने काढून टाकली जाणार आहेत.  रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याने काही निर्बंध उठवण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

लहान मुलांच्या लसीकरणाचे धोरण नाही

लहान मुलांच्या लसीकरणाबाबत देशात अजून कोणतेही धोरण ठरलेले नाही, मात्र तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे. आम्ही त्याची सगळी तयारी करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area