सोलापुरात राडा, दारूच्या अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला, पोलीस निरीक्षक गंभीर जखमी

सोलापूर : माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे अवैध हातभट्टी चालवणाऱ्या दारुच्या अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात वेळापूर पोलीस ठाण्याचे स्वत: पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे आणि पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुके हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे (Mob attack on police in Solapur).

नेमकं काय घडलं?

वेळापूर येथील पालखी चौक येथून काही अंतरावर पारधी समाजाची वस्ती आहे. तिथे अवैध हातभट्टी दारुचा अड्डा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विशेष म्हणजे ही हातभट्टी गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहे. मात्र, पोलिसांनी आतापर्यंत तिथे फारशी मोठी कारवाई केली नव्हती. दरम्यान, पोलीस आज (28 मे) संध्याकाळी पारधी वस्तीत गेले. तिथे त्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. काही लोकांची चौकशी केली. मात्र, यावेळी मोठा गदारोळ झाला (Mob attack on police in Solapur).

20 ते 25 महिला आणि पुरुषांचा पोलिसांवर हल्ला

पारधी वस्तीमध्ये 20 ते 25 महिला आणि पुरुषांनी मिळून थेट पोलिसांवरच हल्ला केला. यावेळी पोलिसांनी जमावाला प्रतिकार करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला. मात्र, जमावावर ताबा मिळवणं हे पोलिसांच्या अवाक्याबाहेर होतं. या गदारोळात दोन पोलीस गंभीर जखमी झाले. तर एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला.

पोलीस गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरु

जमावाच्या हल्ल्यात पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे आणि पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुके हे गंभीर जखमी झाले. तर पोलीस नाईक महेरकर यांना किरकोळ दुखापत झाली. जखमींना सध्या वेळापूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

अद्याप कुणालाही अटक नाही

दरम्यान, या सर्व गदारोळानंतर आरोपींवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. पोलीस लवकरच या विरोधात कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पोलीस निरीक्षकच गंभीर जखमी असल्याने हे प्रकरण आता जास्त संवेदनशील बनलं आहे. याप्रकरणी जमावाविरोधात शनिवारी (28 मे) मोठी कारवाई होण्याचा अंदाज स्थानिकांकडून वर्तवण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area