‘केईएम’मधील स्वायत्त संस्थेतील घोटाळ्याप्रकरणी एफआयआर; मुंबई महापालिकेकडून मोठा खुलासा

 मुंबई: केईएम रुग्णालयातील ‘डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट’ मध्ये पाच कोटींचा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी केईएम रुग्णालयाने भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच ही ट्रस्ट केईएम रुग्णालय किंवा महापालिकेच्या अख्त्यारित नाही. ही ट्रस्ट स्वायत्त आहे, असा खुलासा मुंबई महापालिकेने केला आहे. (mumbai civic body clarification on kem hospital scam)

केईएम रुग्णालयातील ‘डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट’मध्ये पाच कोटीचा घोटाळा झाल्याचं उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यावर महापालिकेने तातडीने खुलासा केला आहे. केईएम रुग्णालयाला 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 1991 च्या सुमारास तत्कालीन प्राध्यापक-शिक्षक व माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने ‘डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट’ या नावाने एका स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली होती. या स्वायत्त संस्थेद्वारे प्रामुख्याने वैद्यकीय संशोधन व अनुषंगिक सहकार्य करण्याचे कार्य केले जाते. तसेच सदर संस्था पूर्णपणे स्वायत्त असून ती बृहन्मुंबई महानगरपालिका किंवा केईएम रुग्णालयाच्या अखत्यारित नाही. या स्वायत्त संस्थेच्या निधीमध्ये संस्थेचे कंत्राटी कर्मचारी असणाऱ्यांनी अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे मानद अध्यक्ष व केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हेमंत देशमुख यांनी दिली आहे.


पालिकेचं स्पष्टीकरण

>> ‘डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट’च्या विश्वस्त मंडळावरील सर्व व्यक्ती या मानद ‘विश्वस्त’ आहेत. त्या स्वयंसेवी पद्धतीने या संस्थेचे काम बघतात. तथापि या संस्थेच्या दैनंदिन कामकाजासाठी काही कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर संस्थेमध्ये कार्यरत आहेत, असं देशमुख यांनी सांगितलं.


>> या स्वायत्त संस्थेच्या अनुषंगाने महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या स्वायत्त संस्थेच्या कामांसाठी महापालिकेचा किंवा केईएम रुग्णालयाच्या कोणताही निधी उपयोगात आणला जात नाही. संस्थेला मिळणाऱ्या देणग्यांमधून या संस्थेचे कामकाज चालते. सबब, आर्थिक दृष्ट्या व प्रशासकीय दृष्ट्या ‘डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट’ ही पूर्णपणे स्वायत्त संस्था आहे.


>> या संस्थेत काम करणारे एक लेखापाल व एक लिपिक यांनी गेल्या काही वर्षात खोटी कागदपत्रे तयार करून सदर स्वायत्त संस्थेचा निधी अन्यत्र वळविला. त्यामुळे संस्थेचे मानद अध्यक्ष डॉक्टर हेमंत देशमुख यांनी भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये संबंधित लेखापाल श्रीपाद देसाई व लिपिक राजन राऊळ यांच्या विरोधात एफ.आय.आर.’ तक्रार दाखल केली आहे.


>> या दोन्ही कर्मचाऱ्यांना ट्रस्टच्या कामातून यापूर्वीच काढून टाकण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांच्या स्तरावर योग्य ती चौकशी व तपास करण्यात येत आहे. त्याचबरोबर गेल्या साधारणपणे 12 वर्षांच्या कालावधीत करण्यात आलेल्या अपहारामुळे संस्थेच्या संशोधकीय कामांवर कोणताही प्रतिकूल परिणाम झाला नसल्याचा निर्वाळा देशमुख यांनी दिला आहे. (mumbai civic body clarification on kem hospital scam)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area