कर्जहप्ते चुकविण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा वापर; आरोपीला अटक

 ट्रेलरवर असलेले बँकेचे कर्ज चुकविण्यासाठी स्वत:च्या ट्रेलरवर दुसऱ्याच ट्रेलरवरील नंबरप्लेट लावणाऱ्या ट्रेलरचालकाला कळंबोली वाहतूक पोलिसांनी बुधवारी पकडले. राम गोविंद निसाद असे या ट्रेलरचालकाचे नाव असून कळंबोली पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तसेच, त्याचा ट्रेलरदेखील जप्त केला आहे.

कळंबोलीतील रोडपाली येथे राहणाऱ्या राम गोविंद निसाद याचे याच भागात गॅरेज आहे. राम गोविंद याने काही वर्षांपूर्वी बँकेकडून कर्ज घेऊन ट्रेलर विकत घेतला होता. मात्र ट्रेलरचे हप्ते थकल्याने बँकेकडून त्याच्या ट्रेलरवर जप्तीची कारवाई होण्याची त्याला भीती होती. त्यामुळे ट्रेलरवरील बँकेचे हप्ते चुकविण्यासाठी राम याने ट्रेलरवर दुसऱ्याच ट्रेलरवरील नंबरप्लेट लावली होती. ही बनावट नंबरप्लेट लावून तो मागील सहा महिन्यांपासून व्यवसाय करत होता. ही माहिती कळंबोली वाहतूक शाखेतील पोलिस शिपाई दीपक गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार, वाहतूक पोलिसांनी रोडपाली येथे जाऊन संशयित ट्रेलरचा चालक राम याच्याकडे चौकशी केली असता, त्याने या ट्रेलरचा मालक तोच असल्याचे सांगितले. मात्र ट्रेलरबाबत अधिक माहिती देण्यास त्याने टाळाटाळ केली. वाहतूक पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने ट्रेलरवर बँकेचे कर्ज असल्याने या कर्जाचे हप्ते चुकविण्यासाठी ट्रेलरवर बनावट नंबरप्लेट लावल्याचे कबूल केले. तसेच, त्याने जासई येथे उभ्या असलेल्या ट्रेलरवरील नंबरप्लेट लावल्याचे सांगितल्यानंतर वाहतूक पोलिसांनी संबंधित ट्रेलरचालकाला बोलावून त्यालादेखील याबाबतची माहिती दिली. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी राम याला कळंबोली पोलिसांच्या ताब्यात दिले.Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area