लॉकडाऊन आणि कोरोनाचा कहर, तरीही पेट्रोलची घोडदौड, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पेट्रोल 100 रुपये लिटर!

                                         
नांदेड : राज्यात कोरोनाने थैमान घातलं आहे. दररोज अर्ध्या लाखापेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. महाराष्ट्रात एकीकडे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची घोडदौड सुरुच आहे. नांदेड जिल्ह्यात धर्माबाद येथे तर या दरवाढीने कहरच केला आहे. इथे 100 रुपयांपेक्षा जास्त किंमतीत एक लिटर पेट्रोल मिळतंय. त्यापाठोपाठ आज परभणीतही पेट्रोलची किंमत 100 रुपये प्रतिलिटर अशी झाली आहे (Petrol Diesel price hike in Nanded).

धर्माबादमध्ये सर्वात महाग इंधन

राज्यातील सर्वात महागडे इंधन हे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद इथे विकलं जातंय. धर्माबादमध्ये आज पेट्रोलचा भाव शंभर रुपयांच्या पार गेलाय तर डिझेल 90 रुपयांवर पोहोचलंय. धर्माबादमध्ये हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे पेट्रोल 100 रुपये 4 पैसे प्रतिलिटर दराने विकलं जातंय. तर इस्सार या खाजगी कंपनीचे पेट्रोल 102 रुपये प्रतिलिटर इतक्या महागड्या दराने विकलं जातंय. त्यामुळे तेथील सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे (Petrol Diesel price hike in Nanded).


धर्माबादेत इतकं इंधन महाग का?

धर्माबादला इंधन पुरवठा हा सोलापूरच्या डेपोतून होतो. हे अंतर सर्वाधिक असल्याने वाहतूक खर्च वाढतो, त्यामुळे इथे इंधन महाग आहे. विशेष म्हणजे पेट्रोलचा भाव वाढल्याने सध्या धर्माबादमध्ये पेट्रोल पंपावर शुकशुकाट पाहायला मिळतोय. या महागाईमुळे धर्माबादचे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.


इंधन भरण्यासाठी अनेकजण तेलंगणात ये-जा करतात

धर्माबाद हा तेलंगणा राज्याला लागून असलेला तालुका आहे. मात्र इथून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यात पेट्रोलचे भाव कमी आहेत. त्यामुळे इंधन भरण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जण तेलंगणात ये-जा करतात. तसेच धर्माबादचा सीमावर्ती भाग गोदावरी नदीमुळे समृद्ध म्हणून ओळखला जातो. इथले शेतकरी पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतात बारामाही पिके घेतात. शेतीच्या अनेक कामांसाठी डिझेलची गरज भासते, अशावेळी सीमावर्ती भागातील हे शेतकरी आपल्या महाराष्ट्रातील महागडे इंधन घेण्यापेक्षा तेलंगणात जाऊन मोठ्या प्रमाणात इंधनाची खरेदी करतात. त्यामुळे धर्माबादचे पेट्रोल पंप हे नेहमीच सुनेसुने दिसतात.


अवघ्या पाच किमीच्या अंतरात पेट्रोलच्या किंमतीत एवढा फरक का?

दुसरीकडे शेजारी असलेल्या तेलंगणा राज्यातील पेट्रोल पंपावर नेहमी रांगा लागलेल्या असतात. आपल्या देशात अनेक जागी धर्माबादसारखीच समस्या आहे. प्रत्येक राज्याची महसूल आणि कर रचना वेगवेगळी आहे. इंधन विक्रीवरचा प्रत्येक राज्याचा वेगवेगळा अधिभार असतो. त्यामुळे ऑईल डेपोपासून अंतर कितीही असू द्या त्या त्या राज्यात त्यांच्याच ऑईल डेपोपासून इंधनाचा पुरवठा केल्या जातो. त्यातून ग्राहकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागतो.


राज्यात सलग चार दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

गेल्या दोन महिन्यांपासून म्हणजे मार्च आणि एप्रिलमध्ये काही दिवस सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होत होती. विशेष म्हणजे 4 मेपूर्वी 23 फेब्रुवारीला पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत शेवटची वाढ झाली होती. तर मार्चमध्ये तीन दिवस आणि एप्रिलमध्ये एक दिवस किंमतीत घट झाली होती.
दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area