28 वर्षीय पत्नीसह एक वर्षाच्या मुलाची हत्या, पुण्यात पतीची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : 28 वर्षीय पत्नी आणि एक वर्षाच्या मुलाची हत्या करुन पतीने आत्महत्या केल्याचं समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बेरोजगारीला कंटाळून पतीने टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. (Pune Husband Kills Wife One Year old Son commits Suicide)

हनुमंत शिंदे असं पत्नी-मुलाची हत्या करुन आत्महत्या करणाऱ्या पतीचं नाव आहे. हनुमंतने 28 वर्षीय पत्नी प्रज्ञा शिंदे आणि एक वर्षांचा मुलगा शिवतेज शिंदे यांची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर हनुमंतने गळफास घेत स्वतःचंही आयुष्य संपवलं. यामुळे शिंदे कुटुंब राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.


बेरोजगारीला कंटाळून टोकाचं पाऊल

बेरोजगारीला कंटाळून हनुमंत शिंदे याने कुटुंबाला संपवल्याची माहिती आहे. हत्या आणि आत्महत्या प्रकरणी पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशमधील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या काळात कौटुंबिक हत्या-आत्महत्यांचं वाढतं सत्र पाहायला मिळत आहे. बेरोजगारी वाढल्याने अश्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं बोललं जात आहे.


खडकवासला धरणात तरुणाची आत्महत्या

गाडी विकून येणारे पैसे माझ्या आईला द्या, असा व्हॉईस मेसेज चुलत भावाला पाठवून तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. 31 वर्षीय तरुणाने खडकवासला धरणात उडी घेऊन आयुष्य संपवलं.


चंद्रशेखर गोपाळ पुजारी या तरुणाने पानशेत रस्त्याला लागून खडकवासला धरणाच्या भिंतीजवळ पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. तो पुण्यातील सोमवार पेठ भागातील रहिवासी होता. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area