Ramdev Vs IMA: रामदेव म्हणतात, IMA अधिकाऱ्यांचे संबंध धर्मपरिवर्तन करणाऱ्यांशी !

                                         

नवी दिल्ली: योगगुरु रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच IMA यांच्यात सुरु झालेला वाद अजूनही थांबलेला नाही. आता तर रामदेव यांनी IMA अधिकाऱ्यांचा संबंध धर्मपरिवर्तन करणाऱ्यांशी असून ते धर्म परिवर्तन करण्यासाठी उकसवतात असा आरोप केला आहे. (Ramdev links IMA to conversion anti Hindu Kumbh super spreader)

योगगुरु रामदेव आणि आयएमएचा वाद गंभीर

योगगुरु रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचा वाद आता आणखी गंभीर होताना दिसतो आहे. कारण रामदेव यांनी आता IMA च्या पदाधिकाऱ्यांवर जे आरोप केलेत ते गंभीर आहेत. हिंदी वर्तमानपत्र दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत रामदेव यांनी सनसनाटी आरोप केलेत. धर्मपरिवर्तन करणाऱ्या लोकांशी IMA च्या पदाधिकाऱ्यांचे संबंध आहेत, एवढच नाही तर इंटरनॅशनल फंडिंग घेणाऱ्या लोकांनीच कुंभला कोरोना सुपरस्प्रेडर म्हणत बदनाम केल्याचही रामदेव म्हणाले. हे सगळं धादांत खोटं आहे. कारण कुंभमध्ये लोकच आले नाहीत. 99 टक्के तंबू रिकामे होते आणि आखाड्यांमध्ये फार फार तर 500 ते एक हजार साधू होते असाही रामदेव यांनी दावा केला.


तर मग देशभक्त कोण?

रामदेव सवाल करतात की, डॉक्टर मला देशद्रोही म्हणत असतील तर मग देशभक्त कोण आहे? देशभक्त ते लोक आहेत ज्यांचे संबंध धर्मपरिवर्तनाशी जोडले गेलेत? ज्यांना असं वाटतं की, कोरोना चांगला आहे कारण त्यामुळे धर्मपरिवर्तनही वाढेल. हे असं म्हणतात की, कोरोनासाठी औषधाची गरज नाही, धर्माची विशेष कृपा झाली की सगळं ठिक होईल. अशी अंधश्रद्धा बाळगणारे लोकच तर IMA चे अध्यक्ष झालेले आहेत असही रामदेव यांनी म्हटलं आहे.

कुंभला कोण बदनाम करतंय?

रामदेव यांनी आरोप केलाय की, कुंभला कोरोनाचा सुपरस्प्रेडर म्हणणाऱ्यांना विदेशातून फंड मिळतो. हे लोक ‘हर की पौडी’चे फोटो दाखवून त्याला कुंभ म्हणतायत. असं करणाऱ्यांमध्ये हिंदू विरोधी, भारत विरोधी आणि सोशल मीडियातली एक लॉबी सामिल आहे. कुंभमध्ये 99 टक्के तंबू रिकामे होते आणि आखाड्यांमध्ये हजारपेक्षा जास्त साधू नव्हते. फक्त दोन ते तीन साधूंचा मृत्यू झाला. देशात 5 ते 7 लाख साधू आहेत, त्यापैकी 5 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला तर कुंभने कोरोना पसरवला का? असा सवालही रामदेव यांनी केला आहे.

IMA चे डॉक्टरही घरी कपालभाती करतात!

रामदेव यांनी दावा केलाय की, अॅलिओपॅथीशी संबंधीत 90 टक्के डॉक्टर्सही योग, आयुर्वेद आणि नॅचरोपॅथी उपचाराशी सहमत आहेत. IMAचे जे लोक आमच्याविरोधात झेंडा उचलून विरोध करतायत ते ही घरी कपालभाती करतात. ज्या वक्तव्याच्या आधारावर माझ्यावर राजद्रोहाचा आरोप केला जातोय ते मी केलेलच नाही. मी तर सोशल मीडियावर आलेला एक मेसेज वाचवून दाखवत होतो. कोरोनीलवर रामदेव म्हणाले की, कोवॅक्सिनलाही WHO ने मान्यता दिलेली नाही. तिथं एक लॉबी काम करते, ज्यांच्यामुळे तुम्हाला हे सगळं मिळतं.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area