झाड तोडण्यास नकार देणाऱ्या दलिताच्या घरच्यांचे अपहरण, गरोदर पत्नीवर मुलांसमोरच बलात्कार

                                     

दलित मजुराला शेतावर कामाला बोलावल्यानंतर त्याने झाड तोडण्यास नकार दिला असता त्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर मारहाणी दरम्यान तो पळून गेल्यानंतर या गुंडांनी थेट त्याच्या घरी पोहोचून त्याची गरोदर पत्नी, दोन मुले आणि आईलाही मारहाण केली. यानंतर त्यांचे अपहरण करून त्यांचा 4 दिवस छळ करण्यात आला. हे नराधम इतक्यावरच थांबले नाहीत तर, त्यांनी मुलांसमोरच या मजुराच्या गरोदर पत्नीवर बलात्कारही (Rape) केला. मध्यप्रदेशातील छतरपूर इथं ही संतापजनक घटना घडली आहे.

याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. मुख्य आरोपी गावातीलच असून त्याला गुरुवारी अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यासोबतचे दोघं पकडण्यापूर्वीच फरार झाल्याचीही माहिती त्यांनी दिली. गुरुवारी मजुराच्या पत्नीनं पत्रकारांशी बोलताना तिच्यावर बलात्कार झाल्याची माहिती दिली. मात्र, पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत तिने याबाबत उल्लेख केलेला नाही. जर तिनं ही माहिती लेखी दिली तर आरोपींवर बलात्काराच्या गुन्ह्याचंही कलम लावण्यात येईल, असं पोलीस विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.

सध्या या गुन्ह्यातील आरोपींवर मारहाण करून इजा पोहोचवणे, अपहरण, अश्लीलता, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार निवारण (ॲट्रॉसिटी) कायद्याअंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. महिलेच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत. याबाबत तिने तिच्या तक्रारीत उल्लेख केला आहे. मात्र, तिनं लैंगिक अत्याचाराविषयी‌ काही लिहिलेले नाही. राजनगर ठाणे प्रभारी पंकज शर्मा यांनी याबाबत माहिती दिली.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ पासून 350 किलोमीटरवर असलेल्या छतरपुर जिल्ह्यात बुधवारी ही संतापजनक घटना उघडकीस आली. घटनेतील दलित मजुराच्या कुटुंबीयांना चार दिवस डांबून ठेवल्याची बाब पत्रकारांनी पोलिसांपर्यंत पोहोचवल्यानंतर या सर्वांची सुटका करण्यात आली. कामावर आलेल्या 32 वर्षीय दलित मजुराने आरोपींना शेतातील झाड तोडण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी या मजुरासह त्याच्या कुटुंबीयांवर अत्याचार केल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. या मजुरानम तब्येतीचे कारण सांगत झाड तोडण्यास नकार दिला होता. याप्रकरणी आत्तापर्यंत तीन आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. मुख्य आरोपीला पकडण्यात यश आले असून इतर दोघे अद्याप फरार आहेत.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area