सावधान, कोल्हापुरात म्युकरमायकोसिसचा हाहाकार…

महिन्याभरात जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या शंभरीकडे (mucer mycosis patients in kolhapur) सरकत आहे. आजवर एकूण ८३ रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे म्युकरमायकोसिसचे गांभीर्य वाढले असून, सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग उपचारसेवा (treatment) देत असले तरी खासगी डॉक्टरांची मदत घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.

म्युकरमायकोसिस आजाराचे दोन ते सहा रुग्ण रोज नव्याने सापडत आहेत. यात गंभीर रुग्णांवर सीपीआर रुग्णालयात (CPR hospital in kolhapur) उपचार सुरू आहेत. येथील दोन्ही कक्ष हाऊसफुल्ल झाले आहेत. १२ रुग्णांवर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. अशात जिल्ह्याच्या ग्रामीण, कोकण व सीमा भागातून म्युकरमायकोसिसचे रुग्ण कोल्हापुरात उपचारासाठी येतात.

शासकीय रुग्णालयात मोफत उपचार होत असल्याने येथे उपचार घेण्याचा कल वाढत आहे. याचवेळी जिल्ह्यातील उपजिल्हा तीन रुग्णालय, तसेच ग्रामीण रुग्णालयात जवळपास चार जण नाक, कान, घसा तज्‍ज्ञ आहेत; पण नेत्ररोग तज्‍ज्ञ, मेंदू विकार तज्‍ज्ञ, प्लास्टिक सर्जरी तज्‍ज्ञ यांची संख्या नगन्य आहे.

याशिवाय उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाचा ताण क्षमतेपेक्षा अधिक आहे. त्यामुळे येथे म्युकरमायकोसिसवर उपचार होत नाहीत. परिणामी जिल्हाभरातून रुग्ण सीपीआरकडे येतात. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पाच खासगी रुग्णालयांत मोफत उपचार होतात, तिथेही योजनेत उपचार देताना नाही, होय केले जाते. यातून म्युकरमायकोसिसचे रुग्ण अचानक वाढल्यास एका वेळी मोठ्या संख्येने उपचाराला आलेल्या रुग्णांवर उपचार होणार कसे, असा गंभीर पेच निर्माण झाला आहे.

सर्व वैद्यकीय तज्‍ज्ञांनी एकत्र येण्याची गरज

शहरात ३० नाक, कान, घसा तज्‍ज्ञ आहेत. सात-आठ मेंदू विकार तज्‍ज्ञ आहेत. तेवढेच प्लास्टिक सर्जरी तज्‍ज्ञ आहेत. एमआरआय करणारे आठ लोक आहेत. मात्र, हे सर्वजण स्वतंत्र खासगी प्रॅक्टिस करत आहेत व म्युकरवर उपचार करण्यासाठी वरील सर्व वैद्यकीय तज्‍ज्ञांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यांना एकत्र आणण्यासाठी शासकीय डॉक्टरांनी जरूर प्रयत्न केले, मात्र त्यात यश आलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीच तज्‍ज्ञांशी चर्चा करणे गरजेचे आहे.

परस्परात समन्वयाचा अभाव

महापालिकेची बारा रुग्णालय शहरात आहेत. एकाही रुग्णालयात म्युकरवर उपचार (treatment) होत नाहीत. त्यामुळे खासगी तज्‍ज्ञ डॉक्टरांची मदत घेऊन महापालिकेच्या एखाद्या रुग्णालयात म्युकर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष करणे, येथेच खासगी तज्‍ज्ञांची मानद सेवा घेऊन म्युकरवर प्रभावी उपचार करणे शक्य आहे. याच धर्तीवर जिल्हा परिषदेच्या स्तरावरील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील तालुकावरही अशी सुविधा करणे आवश्यक आहे, मात्र वैद्यकीय शिक्षण सार्वजनिक आरोग्य विभाग व खासगी रुग्णालये यांच्या परस्परातील समन्वयाचा अभाव आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area