व्हिएतनाममध्ये सापडला कोरोनाचा धोकादायक व्हेरिएंट, हवेतून वेगाने संसर्ग

                                  

नवी दिल्ली: देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याची चिन्हे दिसत असतानाच आता आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, आता व्हिएतनाममध्ये कोरोना विषाणूचा आणखी एक घातक उपप्रकार (व्हेरिएंट) सापडल्याचे समोर आले आहे. व्हिएतनामच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हेरिएंट भारत आणि इंग्लंडमध्ये आढणाऱ्या विषाणूपासून तयार झाला आहे. या कोरोना व्हेरिएंटच्या हवेतून प्रसाराचा वेग एरवीपेक्षा जास्त आहे. (Vietnam detects hybrid of Indian an UK covid variant )

व्हिएतनामधील तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हा विषाणू भारत आणि इंग्लंडमधील कोरोना विषाणूच्या संगमातून तयार झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून अद्याप यावर कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. व्हिएतनाममध्ये आतापर्यंत कोरोनाचे एकूण सात व्हेरिएंट आढळून आले आहेत. यामध्ये भारत व इंग्लंडमधील B.1.617.2 आणि B.1.1.7 व्हेरिएंटसचाही समावेश आहे.

व्हिएतनाममध्ये कोरोनाची दुसरी लाट

गेल्यावर्षी व्हिएतनाम सरकारने कोरोनाची साथ यशस्वीपणे आटोक्यात आणली होती. मात्र, एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात व्हिएतनाममध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला प्रारंभ झाला होता. व्हिएतनाममधील 63 शहरांपैकी 31 शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. सध्या याठिकाणी कोरोनाचे साधारण 3600 रुग्ण आहेत.

भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी घट

भारतात शनिवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी घट होताना दिसली. देशात शुक्रवारी दिवसभरात 1 लाख 73 हजार 790 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 617 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 84 हजार 601 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. 45 दिवसांनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या निचांकी आकड्यांवर गेली आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area