4 दिवसांपासून बेपत्ता, आज थेट मृतदेह आढळले; 2 अल्पवयीन मुलींची हत्या की आत्महत्या? शहापूरमध्ये एकच खळबळ

पालघर : शहापूर तालुक्यातील उंबरमाळी गाव हद्दीतील पेठ्याचापाडा वस्तीतून चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या 2 तरुणींचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मध्य रेल्वेच्या उंबरमाळी स्थानक परिसरात उघडकीस आली आहे. अंदाजे 14 ते 16 वयोगटातील या तरुणी असून दोघींचे मृतदेह 500 मीटरच्या अंतरात मिळून आले. ही हत्या आहे की आत्महत्या याचा पोलिस शोध घेत आहे. (2 minor girl dead body Found in Shahapur palghar)

4 दिवसांपासून बेपत्ता, आज थेट मृतदेह आढळले

उंबरमाळी गावापासून 3 किमी अंतरावर असलेल्या पेठ्याचापाडा आदिवासी वस्तीत आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असलेल्या दोघीही मंगळवारी घराबाहेर पडल्या होत्या. पुन्हा त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध सुरु केली.आजूबाजूचा परिसर, मित्र-मैत्रिणी व इतर नातेवाईकांकडे चौकशी केली. ३ दिवस शोध घेत असताना अखेर चौथ्या दिवशी सकाळी १० वाजताच्या सुमारास उंबरमाळी गाव परिसरातील वाहत्या पाण्याच्या नाल्यालगत दोन बेपत्ता तरुणींपैकी एका तरुणीचा मृतदेह नागरिकांना आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच कसारा प्रभारी पोलीस निरीक्षक केशवराव नाईक, सलमान खतीब यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचून मृतदेहाची पाहणी केली. दरम्यान आणखी एका बेपत्ता तरुणीचा शोध पोलिसांनी ग्रामस्थ, पोलीस पाटील यांच्या मदतीने सुरू केला असता, दुपारी ४ वाजताच्या सुमारास उंबरमाळी रेल्वे स्थानक परिसरात पाठोपाठ ती दुसरी तरुणी मृतावस्थेत आढळून आली.

सहा तासाच्या आत दुसरा मृतदेह आढळला

हा धक्कादायक प्रकार एका पाठोपाठ समोर येताच नागरिकांसह पोलिसही पुरते चक्रावले गेले. एकाच दिवसी पेठ्याचापाडा वस्तीतील 2 तरुणींचे मृतदेह आढळून आल्याने संशयाची सुई उभी राहत असून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

पोलिसांचा तपास सुरु

शहापुर उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक केशवराव नाईक, उपनिरीक्षक सलमान खतीब यांच्यासह पोलीस कर्मचारी मृतदेह प्रकरणाच्या तपासाकडे वळले आहेत. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area