मीरा चोप्रासोबतच छोट्या पडद्यावरील ‘लाडक्या भाभी’चेही लसीकरणासाठी बोगस आयडी?

ठाणे : अभिनेत्री मीरा चोप्रा (Actress Meera Chopra) हिने बनावट ओळखपत्र तयार करुन बेकायदेशीरपणे लस घेतल्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘भाभी जी घर पे है’ मालिकेतील अनिता भाभीच्या व्यक्तिरेखेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री सौम्या टंडन (Saumya Tandon) हिनेही बोगस ओळखपत्र बनवले होते, अशी माहिती समोर आली आहे. (Actress Meera Chopra Bhabi Ji Ghar Par Hai! fame Actress Saumya Tandon reportedly made fake identity card for vaccination enquiry reveals)

अभिनेत्री सौम्या टंडननेही लसीकरण करुन घेण्यासाठी बनावट ओळखपत्र तयार करुन घेतल्याचा दावा केला जात आहे. ठाणे महापालिकेच्या चौकशी अहवालात अभिनेत्री सौम्या टंडनचे नाव समोर आले आहे. आतापर्यंत 21 बनावट ओळखपत्रे करुन 15 जणांचे बेकायदेशीर लसीकरण झाल्याची माहिती आहे.

कोण आहे अभिनेत्री सौम्या टंडन?

अभिनेत्री सौम्या टंडनने ‘ऐसा देस है मेरा’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. ‘जब वि मेट’ या गाजलेल्या सिनेमातही ती रुपच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर ‘कॉमेडी सर्कस’, ‘डान्स इंडिया डान्स’ यासारख्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन तिने केलं. मात्र ‘भाभी जी घर पे है’ मालिकेतील अनिता भाभीच्या व्यक्तिरेखेमुळे सौम्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. गेली जवळपास पाच वर्ष ती ही भूमिका साकारत होती. मात्र नुकतंच तिने मालिकेला अलविदा केल्याची चर्चा आहे. दहा वर्षांच्या डेटिंगनंतर 2016 मध्ये सौम्याने बॉयफ्रेण्ड सौरभ सिंगशी लगीनगाठ बांधली. 2019 मध्ये तिने मुलाला जन्म दिला. सौम्या अक्षयकुमारच्या फिटनेस मंत्रामुळे प्रेरित झाल्याचं सांगते.

मीरा चोप्राचे बनावट आयडीने लसीकरण

ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील कोव्हिड सेंटरमध्ये सुपरवाझर असल्याचे भासवून तामिळ-तेलुगू चित्रपटातील प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्री मीरा चोप्रा हिने लसीकरण करुन घेतल्याचं गेल्या आठवड्यात उघडकीस आलं होतं. लस घेतल्यानंतर मीराने स्वतःच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर तशी पोस्ट शेअर केली होती. लसीचा तुटवडा जाणवत असल्याने 45 वर्षांवरील नागरिकांना प्राध्यानाने लस मिळावी, यासाठी अनेक ठिकाणी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण पुढे ढकलण्यात आलं आहे. अशातच बोगस आयडीने तरुण अभिनेत्रीने गैरफायदा घेत लसीकरण केल्याने सोशल मीडियावर संतापाची लाट उमटली होती.

बोगस फ्रंटलाईन वर्कर लस प्रकरण

दुसरीकडे,  बेकायदेशीर लस देण्यासाठी 21 श्रीमंत तरुण-तरुणींचे बनावट ओळखपत्र तयार केल्याची माहिती चौकशी अहवालात उघड झाली आहे. यापैकी 19 जणांना सुपरवायझर, तर दोघा जणांना अटेंडंट म्हणून बनावट ओळखत्र दिल्याचे समोर आले आहे. बोगस फ्रंटलाईन वर्कर लस प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. लवकरच हा अहवाल पालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा सादर करणार असल्याची माहिती आहे.

खासगी कंपनीकडून ओळखपत्र

ओम साई आरोग्य केअर सेंटर या खाजगी कंपनीने मीरा चोप्रा हिला सुपरवायझर भासवून लस देण्यात आल्याची बाब समोर आलेली आहे. या प्रकरणी संबंधित कंपनी आणि इतर जणांवर पालिका प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी भाजप गट नेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणावरुन भाजप आमदार निरंजन डावखरे यांनीदेखील टीका केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area