म्युकरमायकोसिस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रशासनाला आदेश

                                                

बारामती : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. बारामती शहरासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. दरम्यान कोणीही गाफील राहून चालणार नाही, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शहरात तसंच ग्रामीण भागात जनजागृती करणं गरजेचं आहे. म्युकरमायकोसिस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या, तसंच पॉझिटिव्हीटी रेट पाहून निर्बंध शिथील करण्यातबाबतचे निर्णय प्रशासनाने घ्यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले आहेत. (Ajit Pawar reviews Corona situation in Baramati)

बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती, म्युकरमायकोसिसची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण, ऑक्सिजन उपलब्धता, आरोग्य सुविधा आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा अजित पवार यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामती नगरपरिषद नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे, उपमुख्यमंत्री कार्यालयातील उपसचिव नंदकुमार काटकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

‘म्युकरमायकोसिस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या’

बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तथापि कोणीही गाफील राहून चालणार नाही, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शहरात तसेच ग्रामीण भागात जनजागृती करणं आवश्यक आहे. कोरोना पश्चात होणाऱ्या म्युकरमायकोसिस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या. पॉझिटिव्हीटी रेट पाहून निर्बंध शिथील करण्यातबाबतचे निर्णय प्रशासनाने घ्यावेत. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण जादा आहेत त्या ठिकाणी हॉटस्पॉट घोषित करून लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी सहा मिनिटे चालायची सोपी टेस्ट करुन घ्या, जर ऑक्सिजन कमी झाल्याचे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरचा सल्ला घेऊन पेशंटला ॲडमिट करावे, अशा सूचना अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

‘नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावं’

बारामती तालुक्यात दुसऱ्या लाटेत कोणत्या वयातील व्यक्ती दगावल्या आणि त्यापैकी किती व्यक्तींना दुसरे आजार होते याबाबतचा चार्ट वैद्यकीय अधिकारी यांनी तयार करावा असे आदेशही त्यांनी दिले. पुढील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने संभाव्य तयारी केली असली तरी नागरिकांनी आवश्यक त्या नियमांचे पालन केलेच पाहिजे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता सर्व सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात, अशा सूचनाही अजितदादांनी यावेळी केल्या.

नियमांचे काटेकोर पालन करा- अजितदादा

पोलीस प्रशासनाने वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. सर्व रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित करावी. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेवून आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. लसीकरणाचे नियोजन योग्य प्रकारे करावे म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. शासन, प्रशासनाच्या प्रयत्नांनी आणि नागरिकांच्या सहकार्याने बाधितांची संख्या घटली असली तरीही संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. नियमांचे काटेकोर पालन करावे, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area