तब्बल 11 वर्षांची खडतर मेहनत, कोकणच्या सुपुत्राचा Sword of Honour ने सन्मान, कोकणवासियांची मान उंचावली

 

सिंधुदुर्ग : मोठी स्वप्ने अनेकजण पाहतात, पण ती सत्यात उतरवणारे लाखात अवघे काहीजणच असतात. सिंधुदुर्गातील प्रज्वल कुलकर्णी या मुलाने शालेय दशेत एक फार मोठे स्वप्न पाहिलं आणि तब्बल 11 वर्षांच्या खडतर तपश्चर्येनंतर त्याने ते सत्यातही उतरवलं. जगातील चौथ्या क्रमांकाची बलाढ्य वायुसेना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय वायुसेनेत फायटर पायलट बनण्याचं प्रज्वल कुलकर्णीचे स्वप्न होतं. प्रज्वलने हे स्वप्न सत्यात तर उतरवलंच, पण त्यासोबतच सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीसाठी दिला जाणारा ‘Sword of Honour’ हा बहुमानही त्याला मिळाला. देशपातळीवरचा हा किताब मिळणारा प्रज्वल हा कोकणचा पहिला सुपुत्र ठरला आहे. (Flying Officer Prajwal Kulkarni from Sindhudurg awarded President’s plaque & CAS Sword of Honour)स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी खडतर मेहनत

सिंधुदुर्गचा सुपुत्र असलेल्या प्रज्वल कुलकर्णी याला शालेय जीवनापासूनही भारतीय वायुसेनेत फायटर पायलट बनण्याची स्वप्न होते. शाळेत असल्यापासूनच तो त्यासाठी मेहनत घेत होता. तब्बल अकरा वर्षे यासाठी त्याने खडतर मेहनत घेतली आणि अखेर त्याचे स्वप्न सत्यात उतरवले. विशेष म्हणजे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवताना त्याला वायुसेना अकादमीमध्ये सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीसाठी दिला जाणारा Sword of Honour या बहुमानही मिळाला.

Sword of Honour ने सन्मान

नुकत्याच तेलंगणामधील दिंडीगल येथील एअरपोर्ट अकादमीत पासिंग आऊट परेड पार पडली. यात सिंधुदुर्गच्या प्रज्वल कुलकर्णी याला वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल राकेशकुमार भदूरिया यांच्या हस्ते ही सर्वोच्च मानाची तलवार देऊन गौरवण्यात आले.

प्रज्वलचे आई-वडील असल्याचा अभिमान

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील अनिल कुलकर्णी आणि प्रज्ञा कुलकर्णी यांचा प्रज्वल हा एकुलता एक मुलगा. “प्रज्वलच्या यशाबद्दल भावना व्यक्त करायला आमच्याकडे शब्दच नाहीत. हा बहुमान केवळ सिंधुदुर्गचा नसून संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा आहे,” असे मत प्रज्वलच्या पालकांनी व्यक्त केले. “तसेच ते अभिमानाने आपली ओळख आता प्रज्वलचे पालक म्हणून होत असल्याचे सांगतात.”

“एन. डी. ए. मध्ये असताना सुद्धा प्रज्वलने असेच यश प्राप्त केले होते. कोकणातील तसेच महाराष्ट्रातील युवकांनी संरक्षण दल या आदरयुक्त सेवेला करियरसाठी पर्याय नक्कीच पाहायला हवे. तसेच शिस्त येण्यासाठी प्रत्येक युवकाने सैनिकी शिक्षण घ्यायला हवे,” असे मत प्रज्वलच्या आईने व्यक्त केले.

कोरोनामुळे कामगिरी पाहता आली नाही, आईची खंत

प्रज्वलच्या या यशाबद्दल आई-वडिलांनी आमच्या एका डोळ्यात आनंदाश्रू तर दुसर्‍या डोळ्यात दुःखाश्रू असल्याचं म्हटलं आहे. आमच्या मुलाचे स्वप्न साकार झाले यासाठी डोळ्यात आनंदाश्रू आहेत. पण हे स्वप्न साकार करताना कोरोनामुळे त्याची कामगिरी आम्हाला याची देही याची डोळा पाहता आली नाही, याची खंत त्यांनी बोलून दाखवली.

कोकणातील युवकांच्या स्वप्नांना बळकटी

प्रज्वलच्या या यशाबद्दल अनेकांनी त्याच्या पालकांचे कुडाळ येथे येऊन अभिनंदन केले. तर खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनीसुद्धा प्रज्वलच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत त्याच्या पालकांचे अभिनंदन केले.  प्रज्वलच्या यशाने लष्करी सेवेत अधिकारी म्हणून जाऊ इच्छिणाऱ्या कोकणातील युवकांच्या स्वप्नांना निश्चितच बळकटी मिळणार आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area