Weather Alert: रायगड, नवी मुंबईत अतिवृष्टीचा धोका टळला; ठाण्यात हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

 

नवी मुंबई: रायगड आणि नवी मुंबई परिसराला असलेला अतिवृष्टीचा धोका टळला आहे. कारण, पनवेल आणि नवी मुंबई परिसरात शनिवार सकाळपासून रिमझिम पाऊस बरसत आहे. तर रायगडमध्येही तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) बरसत आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 34 मिमी इतका पाऊस झाला आहे. तर पनवेलमध्ये 29.30 मिमी आणि नवी मुंबईत पावसाची सरासरी 45 मिमी इतकी आहे. (Weather and Rain forecast for Navi Mumbai and Raigad Region)

हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे 10 आणि 11 जूनला नवी मुंबईत अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. तर रायगडमध्येही 10 आणि 11 जूनला वेगाने वारे वाहतील, असा इशारा देण्यात आला होता. या दोन दिवसांमध्ये नवी मुंबई आणि रायगडमध्ये 200 मिमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले होते.

रायगड जिल्हा हा ब्रेक द चेन नियमावलीत चौथ्या स्तरावर असल्याने शनिवार आणि रविवारी जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन असेल. परिस्थिती सुधारण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.

ठाण्यात सतर्कतेचा इशारा

सलग दोन ते तीन दिवस पावसाने मोठ्या प्रमाणात ठाणे शहरात देखील हजेरी लावली आहे. तसेच ते येत्या तीन ते चार दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे.

तर काही ठिकाणी सखल भागात पाणी साचायला देखील सुरवात झाली आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत तुरळक घट दिसून येत आहे. तसेच हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area