कोल्हापुरात अतिवृष्टी, एका रात्रीत नद्या पात्राबाहेर

कोल्हापूर : कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचे निमित्त होऊन बुधवारी जिल्ह्यात हजेरी लावलेल्या पावसाने गुरुवारी मध्यरात्री अक्षरश: धुमाकूळ घातला. सर्वच तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने एका रात्रीत जिल्ह्यातील सर्वच नद्या पात्राबाहेर पडल्या, तर तब्बल ४३ बंधारे पाण्याखाली गेले.

पंचगंगेची पाणीपातळी अवघ्या काही तासांत १० फुटांनी वाढली. गगनबावड्यात तर ढगफुटीसदृश १८२ मिलिमीटर इतकी सर्वाधिक पावसाची नोंद झाली. एका रात्रीच्या पावसाने पूर येण्याची जून महिन्यातील आतापर्यंतच्या पावसाची ऐतिहासिक घटना ठरली आहे.गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, पण तेव्हा पावसाने हुलकावणी दिली आाणि बुधवारपासून पाऊस दडी मारणार असल्याचा अंदाज आल्यानंतर मात्र पावसाने जोरदार एन्ट्री घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

जूनमधील पावसाला जोर नसतो, असाचा पारंपरिक अंदाज बांधून सर्व जण गाफील राहिले; पण पावसाने रात्री जोरदार हिसका दाखवत सर्वांचीच फजिती केली. रात्री १० वाजता सुरू झालेल्या पावसाने गुरुवारी सकाळीपर्यंत अक्षरश: जिल्ह्याला झोडपून काढले. टपोऱ्या थेंबाच्या आवाजाने अनेकांनी रात्र जागूनच काढली.

रात्री अकराच्या सुमारास पावसाचा वेग वाढेल, तसे नद्यांवरील एका पाठोपाठ एक बंधारे पाण्याखाली जाऊ लागले. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणीपातळी सकाळी २४ फुटांवर गेली. राधानगरी व दूधगंगा खोऱ्यात अतिवृष्टी झाल्याने याला जोड असणाऱ्या पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा नदीवरील सर्वाधिक बंधारे वेगाने पाण्याखाली गेले. यात पंचगंगा व हिरण्यकेशी नदीवरील ७, भोगावती व दूधगंगा, वारणा नदीवरील २, तुळशी व कुंभी नदीवरील ४, कासारी नदीवरील एक, कुंभीवरील ४, घटप्रभा नदीवरील ६, वेदगंगा नदीवरील ८ बंधारे पाण्याखाली गेले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area