पत्नीनेच फोडले पतीच्या गैरकृत्याचे बिंग, हाय प्रोफाईल सोसायटीतील धक्कादायक प्रकार

कल्याण (ठाणे) : कोरोना संकटामुळे केडीएमसीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर महापालिका निवडणुकीचं बिगूल कधीही वाजण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणूक तोंडावर असताना कल्याणच्या एका हाय प्रोफाईल सोसायटीतील एका घरात मोठ्या प्रमाणात कोरे वोटर आयडी आढळली आहेत. त्यामुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे संबंधित फ्लॅटमध्ये राहणाऱ्या महिलेनेचं आपल्या पतीच्या गैरकृत्याचं बिंग फोडलं आहे. महिलेने पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. पोलिसांचा सध्या या प्रकरणावर सखोल तपास सुरु आहे (Large amount of blank voter ID cards found in Kalyan high profile society).

नेमकं प्रकरण काय?

कल्याण पश्चिमेतील हाय प्रोफाईल असलेल्या ‘माधव संसार’ या सोसायटीत असलेल्या एका फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात कोरे वोटिंग कार्ड सापडले आहेत. विशेष म्हणजे या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या कृतिका मोरे या महिलेनेच याबाबत खुलासा केला. संबंधित कोरे वोटिंग कार्ड हे तिचा पती कामेश मोरे याने घरात ठेवले होते, अशी माहिती महिलेने पोलिसांना दिली. तसेच पतीने मुलाला याबाबत माहिती सांगितल्यानंतर संबंधित प्रकार उघड झाला, असं महिलेने पोलिसांनी सांगितलं.

महिलेचा एकाचवेळी पोलीस आणि तहसीलदारांना फोन

महिलेच्या पतीने त्यांच्या मुलाला वोटर आयडी बाहेर काढून ठेव. मी घ्यायला येतो, असं सांगितलं होतं. वडिलांच्या सांगण्यानुसार मुलाने वोटर आयडी काढले. मात्र ते वोटर आयडी कोरे होते. हे पाहून पत्नी हैराण झाली. यात काहितरी अनुचित प्रकार दडलेला असल्याचा संशय महिलेला आला. त्यामुळे तिने वेळ न दवडता एकाचवेळी थेट खडकपाडा पोलीस आणि कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना फोन केला. आपल्या घरात मोठ्या प्रमाणात कोरे वोटर आयडी कार्ड आहेत, अशी माहिती तिने दिली.

अधिकारी देखील चकीत

संबंधित प्रकार हा गंभीर असल्याने कल्याण तहसीलदार कार्यालयच्या नायब तहसीलदार वर्षा थळकर आपल्या टीमसोबत महिलेच्या घरी पोहचले. घरात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरे वोटर आयडी पाहून अधिकारी देखील थक्क झाले. त्याठिकाणी पंचनामा करण्यात आला. घरात दुसऱ्या तालुक्याचे काही वोटर आयडी आणि मोठ्या प्रमाणात कोरे वोटर आयडी कार्ड होते.

खडकपाडा पोलिसात गुन्हा दाखल

अखेर याप्रकरणी कल्याणच्या खडकापाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे. कामेश मोरे नावाचा हा व्यक्ती अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. केडीएमसी निवडणुकीच्या तोंडावर कोरे वोटर आयडी कशासाठी आणले गेले होते? त्याचा वापर कशासाठी केला जाणार होता? याचा तपास पोलीस करणार आहेत (Large amount of blank voter ID cards found in Kalyan high profile society).

मोरे दाम्पत्यात वाद सुरु, पोलिसांची प्रतिक्रिया

याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक पवार यांनी प्रतिक्रिया दिली. “कृतिका मोरे आणि पती कामेश मोरे यांच्यात वाद सुरु आहे. त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया ही सुरु आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. हाय प्रोफाईल सोसायटीच्या एका व्यक्तीने कोरे वोटर आयडी कुठून आणि कशासाठी आणले, त्याचा कोणाला फायदा होणार आहे, या कृत्यात कामेश मोरे सोबत कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर कामेश मोरे याच्या अटकेनंतर समोर येईल” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area