OBC Reservation : भाजपच्या चोराच्या उलट्या बोंबा, आरक्षण रद्द होण्यास तेच जबाबदार : नाना पटोले

जळगाव : “ओबीसी आरक्षण प्रश्न हा केवळ राज्याचा नव्हे तर देशाचा आहे. संपूर्ण देशातील ओबीसी वर्गाचे नुकसान झाले आहे. भाजपच्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत,” अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana patole) केली. तसेच या प्रश्नावर राज्यसरकारने न्यायलयात धाव घेतली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. (Nana Patole on OBC reservation and ZP election)

पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी नाना पटोले हे आज (बुधवारी) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. जिल्ह्यातील फैजपूर येथे नवीन कृषी कायद्यांची होळी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील इत्यादी उपस्थित होती.

ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर आता राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समितीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्याविरोधात आता भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोलेंनी भाजपवर जोरदार घणाघात केला.

हा केवळ राज्याचा नव्हे तर देशाचा प्रश्न

ओबीसी आरक्षण रद्द होण्यास भाजप सरकार जबाबदार आहे. 2017 मध्ये हा विषय आल्यावर हेच राज्यातील ओरडणारे विरोधी पक्षातील लोक सत्तेत होते, त्यावेळी त्यांनी लक्ष दिले नाही. केंद्र सरकार ओबीसीची आकडेवारी देत नाही. त्यामुळे न्यायालयाने राज्यातील राजकीय आरक्षण रद्द केले आहे. मात्र आता हा केवळ राज्याचा नव्हे तर देशाचा प्रश्न आहे, असे नाना पटोले म्हणाले.

तसेच आता या आरक्षणासाठी राज्य सरकार न्यायालयात गेले आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही लवकरच चर्चा करणार आहोत, अशी माहितीही नाना पटोले यांनी दिली.

अत्याचारी केंद्र सरकारची 5 वर्षे संपण्याची वाट जनता पाहतेय

केंद्रातल्या अत्याचारी मोदी सरकारने जे कृषी विषयक तीन काळे आणले. त्या कायद्यांचे दहन करण्यासाठी मी फैजपुरात आलो आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शेतकरी या कायद्यांना विरोध करत आहेत. फैजपूर ही पावन भूमी आहे. याच भूमीतून काँग्रेसने त्या काळात इंग्रजांच्या विरोधात तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी 50 वे अधिवेशन घेतले होते. त्याची प्रतिकृती म्हणून आज केंद्रात जे भाजपचे सरकार आहे, ते इंग्रजांपेक्षाही अत्याचारी आहे. त्यांनी आणलेल्या कायद्यांचे आज दहन केले आहे.

पाशवी बहुमताच्या आधारावर मोदी सरकार देशाची आर्थिक व्यवस्था, शेतकरी, बेरोजगार आणि गरिबांना संपवण्याचे काम करत आहे. हे लोक बघत आहेत. या अत्याचारी सरकारची 5 वर्षे संपण्याची वाट देशातील जनता पाहत आहे. 2024 मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला. (Nana Patole on OBC reservation and ZP election)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area