Mumbai crime : पाणीपुरी विक्रेत्याला मारहाण, भाजप नगरसेविकेसह चौघांवर गुन्हा

मालाड : एका पाणीपुरी विक्रेत्याला मारहाण केल्याप्रकरणी मालाडमधील भाजप नगरसेविकेसह चौघांवर बांगूरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेविका आणि तिच्या साथीदारांनी दुकानात घुसून तोडफोड केल्याचा आरोपही या विक्रेत्याने केला आहे.

 एव्हरशाईननगर येथे महादेव गवळे यांचे पाणीपुरी विक्रीचे दुकान आहे. राधाकांत यादव हे या दुकानात कामाला आहेत. कडक निर्बंध असल्याने २० मे रोजी गवळे हे दुकानाचे ग्रील बंद करून खाद्यपदार्थ पार्सल देत होते. सायंकाळी एक ग्राहक दुकानावर आला आणि त्याने काही समोसे पार्सल घेतले. दुकानाबाहेर समोसा खाल्ल्यानंतर तो पाणी प्यायला आणि जवळच थुंकला. यावेळी येथून जाणाऱ्या भाजपच्या नगरसेविकेने हे दुकान उघडे असलेले पहिले. ग्राहकाला शिवीगाळ करीत त्या दुकानात घुसल्या. आपल्या इतर तीन साथीदारांना बोलावून त्यांनी यादव यांना मारहाण केली. इतकेच नाही तर दुकानांची मोडतोड केली. दुकानातील काही रक्कमही चोरल्याचा आरोप यादव यांनी केला आहे.

नगरसेविकेचीही तक्रार
दुसरीकडे नगसेविकेनेदेखील त्यांच्या विरोधात बांगूरनगर पोलिसांत तक्रार केली आहे. निर्बंध असतानाही दुकान सुरू असल्याचे दिसल्याने हटकले असताना दुकानदाराने विनयभंग केल्याचा आरोप नगरसेविकेने केला आहे. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area