Nagpur Vaccination | लशीच्या पुरवठ्याअभावी नागपुरात आजही 18 वर्षावरील वयोगटाचं लसीकरण नाही

 

नागपूर : महाराष्ट्रात 22 जून म्हणजेच आजपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिली (Nagpur COVID-19 Vaccination) जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. परंतु, नागपुरात आजंही 18 वर्षावरील वयोगटाचं लसीकरण होणार नसल्याची माहिती आहे. लसीचा साठा नसल्याने नागपूर महानगरपालिकेने या वयोगटाचं लसीकरण सुरु केलेलं नाही (Nagpur COVID-19 Vaccination For 18 Years Old Above Did Not Start Due To Lack Of Dosage).

पण, नागपुरात 30 ते 44 वयोगटाचं लसीकरण वेगाने सुरु आहे. 30 ते 44 वयोगटात काल 11 हजार 231 नागरिकांनी लस घेतलीये. तर, गेल्या तीन दिवसात या वयोगटातील 25 हजार 91 नागपुरकरांचं लसीकरण करण्यात आलंय. आजंही सकाळपासून लसीकरण चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

महाराष्ट्रात आता 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस

18 वर्षांवरील सर्वांचं सरसकट लसीकरण उद्यापासून केलं जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील लसीकरणाची गती वाढवण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं टोपे म्हणाले. त्यामुळे 18 वयापासून पुढील सर्वांनी आपल्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर जाऊन कोरोना लस घ्यावी अशी विनंती टोपे यांनी केली आहे. केंद्र सरकारकडून यापूर्वीच 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस देण्याची घोषणा केली होती. मात्र, महाराष्ट्र सरकारने लसीच्या तुटवड्यामुळे अद्याप 18 वर्षाच्या पुढील नागरिकांना लस दिली जात नव्हती. मात्र, आता 18 वर्षांवरील सर्वांना सरसकट कोरोनाची लस दिली जाणार आहे.

दरम्यान, देशभरात केंद्र सरकार आजपासून 18 वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण करणार आहे. कोरोना लस निर्मिती करणाऱ्या उत्पादकांकडून लसीचा एकूण 75 टक्के भाग केंद्र सरकार खरेदी करणार आहे. या लसी केंद्राकडून राज्य सरकारांना पाठवल्या जाणार आहे. तर 25 टक्के लसीचे डोस खासगी रुग्णालये थेट उत्पादकांकडून विकत घेऊ शकणार आहेत. तशी परवानगी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती.

देशात आतापर्यंत 28 कोटी नागरिकांचं लसीकरण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात कालच्या दिवसात 80 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. आजपासून देशातील 18 वर्षांवरील व्यक्तींना मोफत लस दिली जाणार आहे. 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरु झाल्यापासून कालच्या दिवशी सर्वाधिक व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 8 वाजेपर्यंत 80,96,417 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत 28 कोटी 33 लाख13 हजार 942 लोकांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी 23 कोटी 27 लाख 44 हजार 813 लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर, 5 कोटी 5 लाख 69 हजार हजार 129 लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area