नागपुरात भाजपला धक्का, नगरसेविकेचे सदस्यत्त्व रद्द

 

नागपूर : भाजप नगरसेविका दुर्गा हत्तीठेले (Durga Hattithele) यांचं सदस्यत्त्व रद्द करण्यात आलं आहे. जात प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यामुळे त्यांचं सदस्यत्त्व रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. नागपुरात भारतीय जनता पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या नागपूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दुर्गा हत्तीठेले निवडून आल्या होत्या. (Nagpur Municipal Corporation BJP Corporator Durga Hattithele membership cancelled over Caste Certificate)

आठ महिन्यांचा कार्यकाळ बाकी

दुर्गा हत्तीठेले या नागपूर महापालिकेतील प्रभाग क्रमांक पाच (अ) च्या भाजप नगरसेविका होत्या. अनूसुचित जातीसाठी आरक्षित जागेवरुन त्या निवडून आल्या होत्या. मात्र जात वैधता प्रमाणपत्र निर्धारित वेळेत सादर न केल्यामुळे नगरविकास विभागाने त्यांचे नगरसेवकत्व पूर्वलक्षी प्रभावाने रद्द केले आहे. हत्तीठेले यांचा आठ महिन्यांचा कार्यकाळ बाकी होता. पुढील वर्षाच्या सुरुवातीला नागपूर महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु होईल.काय आहे नियम?

महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 5 (ब) मधील सुधारणेनुसार अनुसूचित जाती, जमातीसाठी राखीव प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना नामांकन पत्र दाखल करतानाच सहा महिन्यांच्या आधी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणार असल्याचं हमीपत्र द्यावे लागते.

दुर्गा हत्तीठेले यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे सप्टेंबर 2017 मध्येच तत्कालीन आयुक्तांनी त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. मात्र हत्तीठेले यांनी त्यावेळी न्यायालयात धाव घेतली होती. याच विषयावर सर्वोच्च न्यायालयात दाखल एका याचिकेवर स्थगितीचे आदेश असल्याने महापालिकेच्या प्रस्तावावर शासनाने निर्णय घेतला नव्हता.

प्रमाणपत्र सादर करण्याची मुदतवाढ

ऑक्टोबर 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने संबंधित याचिका फेटाळली होती. याच काळात राज्य सरकारने जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सहावरुन बारा महिने इतकी केली होती. त्यानंतर शासनाने महापालिकेला पत्र पाठवून हत्तीठेले यांचे जात प्रमाणपत्र सादर करण्याविषयी आवश्यक ती तपासणी करुन पुन्हा प्रस्ताव पाठवण्यास सांगितले होते. मात्र जात वैधता प्रमाणपत्र निर्धारित वेळेत सादर न केल्यामुळे नगरविकास विभागाने त्यांचे नगरसेवकत्व पूर्वलक्षी प्रभावाने रद्द केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area