आएगी याद तुझे मेरी… मुलाला गायक बनवण्याचं स्वप्न भंगलं

 

नागपूर: चार चौघांत उठून दिसेल असा गोरा गोमटा चेहरा, आईने लाडाने वाढविलेलं गुटगुटीत लेकरू, त्यात गाता गोड गळा आणि तितकाच मनमुळावू स्वभाव... असं गुणी लेकरू कोणाला नको असतं. राज पांडे त्या गुणी लेकरांपैकीच एक. त्यामुळं घरच नाही तर अख्खी वस्ती त्याच्यावर फिदा होती. बहिणीसाठी तर तो जिगर का तुकडाच…येता जाता लोक त्याला आवाज द्यायचे... राज वो गाना गा के दिखा ना…म्हणत गळ घालायचे…तोही भाव न खाता लगेच गायचा…कोणालाही नाही म्हणायचा नाही… गोड गळा लाभलेल्या या लेकराचे तारे लवकरच चमकणार….हा विश्वास सगळ्यांनाच होता. पण दबा धरून बसलेल्या नियतीला कदाचित हे मंजूर नसावं… (pandey family lost their son the dream of making a child a singer remained unfulfilled)


एका नराधमाची नजर त्याच्यावर पडली आणि पाहता पाहता सगळ्यांनी पाहिलेले स्वप्न क्षणात भंगलं…कुटुंबाचा केंद्रबिंदू झालेलं पोर उद्यापासून दिसणार नाही याची साधी कल्पनाही कोणी केली नसेल. नऊ महिने रक्ताचं पाणाी करून गर्भात वाढवलेलं पोर असं आगीच्या स्वाधिन होताना पाहून, आईने फोडलेला हंबरडा तर थरकाप उडवित होता.

आईवर झालेल्या कथीत अत्याचाराचा वचपा काढण्यासाठी सुरज साहू या नराधमाने राज पांडे या अवघ्या १५ वर्षांच्या मुलाचं इंदिरा माता नगर येथून अपहरण केलं. क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने सुरजने त्याला घरापासून २२ किलोमिटर अंतरावर हुडकेश्वरच्या हद्दीत नेलं आणि तिथे त्याची निर्दयीपणे हत्या केली.

सर्वांचा लाडका असलेल्या राज सोबत अनपेक्षित झालेल्या या आघातामुळे शनिवारी दुसऱ्याच दिवशी इंदिरा माता नगरात संतप्त पडसाद उमटले. राजच्या मारेकऱ्याला आमच्या हवाली करा, असा आक्रोश करीत वस्तीतला जमाव राजला अखेरचा निरोप देताच घाटावरून थेट पोलिस ठाण्यावर धडकला.

तळहातावर जपलेला काळजाचा तुकडा छिन्नविछिन्न अवस्थेत पाहून त्याची आई गीता, वडिल राजकुमार आणि बहिणीने फोडलेला हांबरडा तर अक्षरश: काळीज चिरणारा होता. मेरे भाई को मार डाला…क्या कसूर था उसका…असा बहिणीने फोडलेला टाहो तर काळजाचा थरकाप उडवून गेला. राजचं अपहरण केल्यानंतर त्याला सोडण्याच्या बदल्यात काकाचं कापलेलं शीर पाठवा अशी विक्षिप्त मागणी राजचा मारेकरी सुरजने केली होती. त्यामुळे अल्पवयीन मुलाच्या या निर्दयी हत्याकांडावरून आता सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area