VIDEO | रायगडचे आगरी खूप डेंजर, घरात कोयते ठेवतात, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्यावर गुन्हा

नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या मुद्यावरुन वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्यासह बाळासाहेबांविषयी एकेरी शब्द वापरत बदनामीकारक वृत्त खाजगी युट्यूब चॅनलवरुन प्रसारित केल्याप्रकरणी पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड (Jagdish Gaikwad) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेच्या तक्रारीनंतर नवी मुंबईतील कळंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रायगडचे आगरी खूप डेंजर आहेत, ते आपल्या घरात कोयते ठेवतात. त्यामुळे एअरपोर्टला नाव द्यायला आल्यास ते परत जाणार नाहीत, असं गायकवाड म्हणाले होते. (Panvel Deputy Mayor Jagdish Gaikwad booked for Video threatening CM Uddhav Thackeray Eknath Shinde)

बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव

नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यावरुन सध्या नवी मुंबई-रायगडमध्ये चांगलेच राजकारण तापले आहे. नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी पूर्वीपासून नवी मुंबई आणि रायगडमधील प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात येत आहे. त्यातच राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करुन तो केंद्राकडे पाठवला आहे.

दि. बा. पाटील यांच्या नावासाठी जोर

राज्य सरकारने अचानकपणे घेतलेल्या या निर्णयानंतर नवी मुंबई रायगडमधील प्रकल्पग्रस्तांमध्ये राज्य सरकार विरोधात चांगलाच रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे यासाठी प्रकल्पग्रस्तांकडून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यास सुरुवात झाली आहे. उपमहापौर जगदीश गायकवाड यांनीसुद्धा समाज माध्यमांवर विमानतळाच्या नामांतराचा मुद्दा उचलून धरला आहे.

जगदीश गायकवाड काय म्हणाले होते?

दरम्यान, नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व .बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या मुद्यावरुन भाजपाचे नगरसेवक तसेच पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी देखील काही महिन्यांपूर्वी एका खासगी यूट्यूब चॅनलवर मुलाखत दिली होती. त्यावळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना एकेरी शब्द वापरुन विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याला विरोध दर्शवला होता. तसेच “नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना आगरी कचका चांगला माहित आहे. ही ठाण्याची हद्द नाही, ही रायगडची हद्द आहे. रायगडचे आगरी खूप डेंजर आहेत, ते आपल्या घरात कोयते ठेवतात. त्यामुळे एअरपोर्टला नाव द्यायला आल्यास ते परत जाणार नाहीत” अशा प्रकारची धमकी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून दिली होती. (Jagdish Gaikwad Uddhav Thackeray )

त्याचप्रमाणे सुमारे 23 मिनिटांची युट्यूब चॅनलवरील मुलाखत त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली होती. उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेची जनमानसात बदनामी होऊन शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याचे शिवसेनेचे रागयड-पनवेल जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी कळंबोली पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच जगदीश गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार कळंबोली पोलिसांनी भाजपाचे नगरसेवक तसेच पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्याविरोधात खाजगी युट्यूब चॅनलवरुन बदनामीकारक वृत्त प्रसारित केल्याप्रकरणी तसेच जनमानसात बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Click here to watch video

https://twitter.com/i/status/1400700992811716610

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area