कोरोना संसर्गामुळे मराठा आरक्षण आंदोलन काही दिवस स्थगित ठेवा

 

कोल्हापूर : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण प्रश्नासाठीचे आंदोलन काही दिवस स्थगित ठेवावे, पोलीस आणि आंदोलकांनी समन्वयाने यातून शांततेचा मार्ग काढावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले.

कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत मराठा आरक्षण आंदोलनाच्या भूमिकेबाबत समन्वयाने चर्चा करण्यासाठी आंदोलकांची बैठक पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावण्यात आली होती. त्याप्रसंगी हे आंदोलन किमान १५ दिवस स्थगित करावे, असे आवाहन अधीक्षक बलकवडे यांनी केेले.

आंदोलनामुळे कोरोना संसर्ग वाढीला प्रोत्साहन मिळू नये त्यासाठी पोलीस व आंदोलक यांच्यात समन्वय असावा, असेही ते म्हणाले. खासदार संभाजीराजे यांनी शासनास अल्टिमेटम दिला आहे, त्यावेळी शासनाने घेतलेल्या निर्णयावर मराठा समाजातून उद्रेक झाल्यास त्याला आम्ही जबाबदार नसू अशाही सूचना आंदोलकांनी मांडल्या.

आंदोलनाबाबत सोशल मीडियावरून भडक संदेश व्हायरल होतात, त्यापासूनही सावध राहावे, असेही आवाहन आंदोलकांना करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पो.नि. शशिराज पाटोळे हे उपस्थित होते.बैठकीस निवासराव साळोखे, बाबा पार्टे, दिलीप पाटील, दिलीप देसाई, प्रसाद जाधव, सचिन तोडकर, हर्षल सुर्वे, भरत पाटील, राजू जाधव आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area