शिवसेनेला चार कारकुन सांभाळणार असतील तर मला कधीही मान्य होणार नाही; राज ठाकरेंचे शब्दच ‘सेनावापसी’ रोखणार?

मुंबई: विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली आहे. शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात धरला. त्यामुळे राज्यात नव्या राजकारणाची नांदी सुरू झाली आहे. त्यातच गेल्या आठवड्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? असा सवाल करण्यात आला. तेव्हा परमेश्वरालाच ठाऊक असं सांगून राज यांनी शिवसेनेबरोबरच्या युतीची दारे उघडी केली आहे. त्यामुळे राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. असं असलं तरी मनसेची शिवसेनेसोबत युती होण्याची शक्यता फारच कमी असल्याचं सांगितलं जात आहे. त्याला कारण राज ठाकरे यांनी शिवसेना सोडताना केलेलं भाषण असल्याचं बोललं जात आहे. (Raj Thackeray Birthday: MNS Leader Raj Thackeray’s uncut speech when he was left shiv sena)काय म्हणाले होते राज ठाकरे?

27 नोव्हेंबर 2005 रोजी राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यावेळी त्यांनी दादरच्या कृष्णकुंज निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी शिवसेनेतील गटबाजी आणि शिवसेना सोडण्यामागची कारणमीमांसा केली होती. “शिवसेना ही या महाराष्ट्राची या देशाची गरज आहे. शिवसेना संपावी, मोडावी, तिचं काही होवो, अशी माझी आजपर्यंत कधी इच्छा नव्हती. यापुढेही कधी नसणार. पण शिवसेनाप्रमुखांनी उभी केलेली एवढी मोठी बलाढ्य संघटना जर चार कारकुन सांभाळणार असतील तर ते मला कधीही मान्य होणार नाही. आणि या चार सहा कारकुनांच्या जीवावर मी महाराष्ट्रात जाऊन यांचा प्रचार करायला तयार नाही”. असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे राज यांच्या सेनावापसीमध्ये ही कारकुन मंडळीच पुन्हा अडथळा निर्माण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय एकीकडे राज ठाकरे यांचा जनाधार घटतो आहे, तर शिवसेनेचा जनाधार वाढत आहे. त्यामुळे राज ठाकरेंशी युती करून मनसेमध्ये प्राण फुंकल्यास पुढे शिवसेनेसाठी ते धोकादायक ठरू शकतं, त्यामुळेही शिवसेना मनसेला जवळ करण्याची शक्यता कमीच असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहे.माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाहीच

घरात जन्माला आलेला पक्ष. किंबहुना शिवसेनेचा जन्म झाला तेव्हा माझाही जन्म झाला नव्हता. या पक्षामध्ये पदावर मी आलो असेल कदाचित 1988 साली. पण शिवसेनेची राजकीय वाटचाल लहान असल्यापासून पाहत आलो. शिवसेनेत काम करत असताना सर्वार्थाने सर्व बाजुंनी झोकून दिलं असताना मला वाटलं नव्हतं माझ्यावर कधीतरी हा प्रसंग येईल. मुळात माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे. तो त्यांच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. तरीही मी आजपर्यंत या बडव्यांच्या मधनं माझ्या विठ्ठलाचं आजपर्यंत दर्शन घेत आलो. मी जे मानतो माझं मंदिर हे विठ्ठलाचं आहे. बडव्यांचं नाही. पण बडवे स्वत:ला समजायला लागले हे त्यांचं मंदिर आहे, अशी टीका राज यांनी केली होती.

दीड दमडीच्या नेत्यांसाठी नेतेपदाचा राजीनामा

शिवसेना ही या महाराष्ट्राची या देशाची गरज आहे. शिवसेना संपावी, मोडावी, तिचं काही होवो, अशी माझी आजपर्यंत कधी इच्छा नव्हती. यापुढेही कधी नसणार. पण शिवसेनाप्रमुखांनी उभी केलेली एवढी मोठी बलाढ्य संघटना जर चार कारकुन सांभाळणार असतील तर ते मला कधीही मान्य होणार नाही. आणि या चार सहा कारकुनांच्या जीवावर मी महाराष्ट्रात जाऊन यांचा प्रचार करायला तयार नाही. यांनी चुका करत राहायच्या, यांनी वाटेल ते निर्णय घ्यायचे, शिवसेना प्रमुखांना वाटेल ते सांगायचं हे आजपणे घडत आलं. मी निमूटपणे शिवसेनाप्रमुखांकडे बघून त्यांच्या आदेशानुसार त्यांच्या शब्दाखातर कधीही गोष्ट मागितली नाही. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन शिवसेनाच वाढवण्याचा प्रयत्न केला. पण ज्यांना ज्या लोकांना दीडदमडीचं राजकारण कळत नाही. त्या लोकांसाठी मी आज या क्षणाला शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा देत आहे, अशी घोषणाच त्यांनी केली होती.

शिवसेनाप्रमुखांना कोंडीत पकडायचे नाही

मी भारतीय विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामाही देत आहे. शिवसेनेसारखी एवढी मोठी संघटना जे संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या पापाचा भागिदार मी होऊ इच्छित नाही. मी जो हा निर्णय घेतला तो पूर्ण विचारांती घेतला आहे. माझ्याकडे येणाऱ्या कुठल्याही शिवसैनिक काळ्या यादीत जाणार असेल तर मला ते आवडणार नाही. मला जे काही करायचं होतं ते मी केलं. या सर्व प्रकरणात अजूनही एक गोष्ट सांगू इच्छितो, माझा हा निर्णय कुणालाही कोंडीत पकडण्यासाठी नाही. किंबहुना शिवसेनाप्रमुखांनाही कोंडीत पकडायचे नाही. माझी तेवढी लायकी नाही. माझी तिकडे कोंडी झाली होती. त्या कोंडीचा उद्रेक झाला हे तुम्हाला सांगू शकतो. माझ्या डोळ्यासमोरून महाराष्ट्राचं भलं कधीही दूर जाऊ शकत नाही. पण या असल्या वातावरणात मी काम करू शकत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

दहा वर्ष अपमान

मला घटना अशा अनेक सांगता येतील. अनेक गोष्टी आपल्यासमोर मांडता येतील. पण मला तेच दळण दळायचं नाही. जेवढे अन्याय, अपमान मला सहन करायचे होते, तेवढे गेली दहा वर्ष मी सहन करत आलो. खासकरून गेली सहा-सात वर्ष. मी पत्रकारांची माफी मागतो. तुम्ही मला प्रतिक्रिया मागायचा, पण मी तुम्हाला टाळायचो. कारण माझ्याकडे उत्तरंच नसायची. त्यात माझा अॅरोगन्स नव्हता, उद्धटपणा नव्हता. तर मी खरोखरच टाळत होतो. मला जर काही बोलायची वेळ आली तर पक्षाला त्याचा त्रास नको म्हणून मी बोलायचं टाळत होतो. त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो, असं ते म्हणाले होते.

कार्याध्यक्षपद देऊन पायावर धोंडा मारला

मी हा माझा वाद किंवा कोणतीही गोष्ट कोणत्याही पदासाठी नाही, शिवसेनेचं कार्यकारी अध्यक्षपद मला मिळावं त्याच्यासाठी हा वाद नाही. त्यासाठी बिलकुल लढा नाही. हे कार्यकारी अध्यक्षपद उद्धवला द्यावं त्याची शिफारस मीच केली होती. बहुदा तेव्हाच मीच माझ्या पायावर धोंडा पाडून घेतला असं मला वाटलं, असं सांगतानाच माझी काही मागणी नव्हती. मला हेच पाहिजे… मला तेच पाहिजे… मला तेच पाहिजे… काहीच नाही…मुंबई पालिकेत काय चाललंय… ठाणे पालिकेत काय चाललंय… कल्याणमध्ये काय चाललंय… महाराष्ट्रात काय चाललंय… या सर्व गोष्टींचा निर्णय चार कारकुनांनी घ्यायचं आणि त्या निर्णयाची जबाबदारी घेऊन मी प्रचारसभांमध्ये लोकांसमोर जायचं आणि काय काय ते खोटं बोलत बसायचं. हे मला शक्य होणार नाही. माझ्याकडून होऊ शकत नाही. मला आतापर्यंत जे सहन करणं शक्य होतं ते सहन केलं. मी फार कधी माझ्या चेहऱ्यावर ही गोष्ट कधी येऊ दिली नाही. जो कोणी येत गेला त्याला मदत केली. पण या सर्व गोष्टी करताना मला स्वत:ला किती त्रास होत होता, हे तुम्हाला किती कल्पना असेल मला माहीत नाही. कदाचित असेलही. पण हे शेवटी किती दिवस मी तरी सहन करायचं याला काही मर्यादा होती, असं त्यांनी सांगितलं होतं.

शक्तीप्रदर्शन करायचं नाही

मला कोणत्याही प्रकारचं शक्तीप्रदर्शन करायची गरज नाही. मी ज्याज्यावेळी सभा घेतली तेव्हा तेव्हा शक्तीप्रदर्शनं झाली आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझे दैवत होते, दैवत आहेत. आणि तेच फक्त माझे दैवत राहणार. सगळ्या बाजूने मी आजपर्यंत माघार घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळेला.. की बाबा… काही तरी चांगलं होईल… काही तरी चांगलं होईल… काही तरी चांगलं होईल… पण आपलं बघतोय दिवसे न् दिवस हे मला फक्त दूरच लोटत आहेत. बरं दूर लोटण्याचं कारण काय? आता माझ्या सभांना गर्दी होते ही काय माझी चूक? माझ्याकडे लोक अपेक्षेने येतात ही काय माझी चूक?, असा सवाल करतानाच मग माझ्याकडे आलेला माणूस याला कोणत्याही पदावर ठेवायचा नाही. आणि नको त्या गोष्टी आमनेसामने करायला तयार आहेत ना.. पण नाहीच… वाट्टेल ते जाऊन शिवसेनाप्रमुखांच्या कानात भरवायचं असं काम सुरू होतं, असा दावा त्यांनी केला होता. माझ्याबरोबरची माझी माणसं काय करतात… हे प्रवीण दरेकर… प्रवीण दरेकर इकडे कुठे तरी असतील बघा… हे म्हणे अरुण गवळीकडे गेले आणि उद्धव ठाकरेंची सुपारी दिली… ह्यांनी दिली की नाही माहीत नाही. पण शिवसेना संपवण्याची सुपारी मला वाटतं यांच्यापैकी कुणीतरी घेतलेली आहे. या प्रवीणला काय गरज आहे… काय आवश्यकता आहे… नाही पद नाही मिळालं…., असं ते म्हणाले होते.कुणासाठीही तिकीट मागितलं नाही

मी कधीही शब्द काढला नाही. याला तिकीट द्या, त्याला पद द्या… म्हटलं तर त्याचं काम होणार नाही… (तेवढ्यात एकाने घोषणाबाजी सुरू केली… तेव्हा मी बोलू का तू बोलू, असं राज म्हणाले.) कोणीही माणूस सांगितला की पहिल्यांदा नाही. मग महिन्याभराने त्याला डायरेक्ट बोलवायचं आणि मला न सांगता त्याला डायरेक्ट पदावर बसवायचं. हीच पद्धत, हेच धंदे सुरू आहेत. यातून काय मिळणार होतं मला माहीत नाही. मी सर्व गोष्टी स्वीकारल्यावर मला पक्षात ही वागणूक मिळत असेल तर मी शिवसेनेच्या कोणत्याही पदावर, नेते पदावर, संघटनेच्या पदावर राहण्याचा मला अधिकार नाही… जर पक्षाचा माझ्यावर विश्वास नसेल तर कोणतंही पद माझ्याकडे ठेवणं योग्य होणार नाही असं मला वाटतं, असं त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं होतं.

कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही

मी जाता जाता एकच सांगेन मी हा निर्णय जरी घेतला असला तरी मी कुठल्याही इतर राजकीय पक्षामध्ये सामिल होणार नाही, अशी घोषणाही त्यांनी केली होती. संजय निरुपमने म्हणे मला आमंत्रण दिलंय… त्याचा स्वत:चा थांगपत्ता नाही हा कुठे आहे. त्याने मला आमंत्रण नाही. म्हणून कोणत्याही राजकीय पक्षात जाण्याचा माझा आजही विचार नाही आणि पुढेही नसणार. जे काही माझ्यावरती आहे, ते माझ्यावर शिवसेनाप्रमुखांचे विचार आहेत. माझ्या डोक्यात, अंगात आणि रक्तात त्यांचे विचार भिनलेले आहेत. हे जरी सत्य असलं तरी शिवसेनेच्या नेतेपदावर मी राहू इच्छित नाही. विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदावर राहू शकत नाही. त्यांना काय करायचं संघटनेचं त्यांनी करावं. पण या चार मंडळींचं, कंपूचं जे काही आहे, त्यांच्या पापात, शिवसेना बुडवण्यात मी वाटेकरी होऊ इच्छित नाही. एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं, असंही ते म्हणाले होते. (Raj Thackeray Birthday: MNS Leader Raj Thackeray’s uncut speech when he was left shiv sena)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area