रेखा जरे- बाळ बोठेचा ‘प्रेमाचा अँगल’, पुढे बदनामीच्या भीतीने हत्या, मुख्य सूत्रधार बाळ बोठेवर अखेर दोषारोपपत्र दाखल!

 

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड (Rekha Jare murder Case) प्रकरणातील मुख्य सूत्रधार बोठेविरोधात (Bal Bothe) दोषारोप पत्र दाखल झालं आहे. पारनेर न्यायालयात बाळ बोठेसह आणखी सात आरोपींविरोधात पुरवणी दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय. साडे चारशे पानांचं हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. या दोषारोप पत्रात एक मोठा खुलासा करण्यात आलाय. प्रेम प्रकरणातून रेखा जरे यांची बाळ बोठेने हत्या केल्याचं पोलिसांनी दोषारोप पत्रात नमूद केलंय. (Rekha jare bal bothe love Angel murder case Charge sheet File Ahmednagar Police)

रेखा जरे- बाळ बोठेचा ‘प्रेमाचा अँगल’

बाळ बोठे आणि रेखा जरे यांच्यातल्या प्रेमाचा अँगल समोर आलाय. रेखा जरे आणि बाळ बोठे यांचे प्रेमसंबंध होते. त्यांच्या नात्यात वारंवार वाद व्हायचे. पुढे बदनामी होऊ नये म्हणून बोठेने रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी दिली, असं पोलिसांनी दोषारोप पत्रात म्हटलं आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी डीवायएसपी अजित पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

बाळ बोठे आणि रेखा जरे यांचे खूप दिवस प्रेमसंबंध होते. त्यांच्या या नात्यात क्षुल्लक कारणांवरुन वारंवार वादावादी व्हायच्या. अनेक वेळा त्यांच्यातल्या बाचाबाचीचं रुपांतर मोठ्या भांडणात झालं. यानंतर या प्रकरणात आपली बदनामी होईल या भीतीपोटी बोठेने हेह हत्याकांड घडवलं, असं पोलिसांनी दोषारोप पत्रात म्हटलं आहे.

बाळ बोठे आणि त्याच्या साथीदारांविरोधात दोषारोप पत्र

बोठेसह त्याचे साथीदार अकुला चंद्रप्पा, राजशेखर चाकली, पी व्यंकट सुब्बाचारी, शेख इस्माईल अली, अब्दुल अरिफ आणि महेश तनपुरे यांच्याविरोधातही दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय. बोठेविरोधात कट रचून खून करणे तर त्याच्या साथीदारांवर त्याला फरार होण्यास मदत करणं या कलमांतर्गत दोष ठेवण्यात आलाय.

रेखा जरे यांची हत्या, बोठेचा पोलिसांना गुंगारा पण पोलिसांनी बेड्या ठोकल्याच!

रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीच्या काही दिवसांतच पाच आरोपींना अटक केली होती. बरेच दिवस पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर मुख्य आरोपी बाळ बोठेला हैदराबाद येथून अटक करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area