जॉन अब्राहमचा ‘मुंबई सागा’ चित्रपट अडचणीत, रा. स्व. संघाच्या बदनामी प्रकरणी निर्मात्यांना नोटीस

  मुंबई : जॉन अब्राहम (John Abraham) ची मुख्य भूमिका असलेल्या ‘मुंबई सागा’ (Mumbai Saga) चित्रपटाच्या निर्मात्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनाम केल्याप्रकरणी नोटीस देण्यात आली आहे. संघाची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप करत महेश भिंगार्डे यांनी चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक संजय गुप्ता (Sanjay Gupta) यांच्यासह इतरांना नोटीस पाठवली आहे. हा सिनेमा दोन महिन्यांपूर्वी अॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. (RSS sends notice to John Abraham starrer Amazon Prime Movie Mumbai Saga Film makers)

चित्रपट कशावर आधारित?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबईतील स्वयंसेवक महेश भिंगार्डे यांनी ‘मुंबई सागा’ चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक संजय गुप्ता आणि फिल्मशी संबंधित इतरांच्या नावे नोटीस पाठवली आहे. 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम याची प्रमुख भूमिका आहे. ही फिल्म मुंबईतील नव्वदच्या दशकातील परिस्थितीवर आधारित आहे. गँगस्टर आणि पोलीस यांच्यातील द्वंद्वाची कहाणी या सिनेमात दाखवण्यात आली आहे.

नेमका आक्षेप काय?

विशेष बाब म्हणजे सिनेमा सुरु होताना हा सिनेमा सत्य घटनांनी प्रेरित असल्याचे लिहून येते. सिनेमातील एका दृश्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात असलेल्या व्यक्तींचा फोटो दाखवला आहे. त्यापैकी एक जण भाऊ नामक व्यक्तिरेखेच्या सेनेचे सदस्य असल्याचे दाखवले आहे. या सेनेतील व्यक्ती मुंबई पोलीस दलात घुसखोरी करुन महत्त्वाची पदे काबीज करत आहे. पोलीस दलात या भाऊ नामक व्यक्तीची स्वतंत्र सेना तयार होत आहे, अशा आशयाची चर्चा या दृश्यात केली जात आहे. या दृश्यातून असे दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे दिसते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे काही कारस्थान करत आहे. या दृश्यामुळे संघाची प्रतिमा मलीन केली जात असून त्याने संघ स्वयंसेवकांच्या भावना दुखावल्या आहेत, असे भिंगार्डे यांनी नोटिशीत म्हटले आहे.

आरोप करणाऱ्यांची अपेक्षा काय?

या सिनेमातून सदर बदनामीकारक दृश्य काढून टाकावे तसेच सर्व मानहानीकारक संवाद काढून टाकावेत. त्याचप्रमाणे वृत्तवाहिन्यांवरुन जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा 7 दिवसांनंतर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे. संबंधित नोटीस अॅड. प्रकाश साळसिंगीकर यांच्या मार्फत पाठवण्यात आली असून निर्मात्यांना सात दिवसात उत्तर देण्यास सांगितले गेले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area