“भारताचे पंतप्रधान ‘जबाबदार’, चीनसोबतचे प्रश्न सोडवायला सक्षम”, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मोदींचं कौतुक

 

मॉस्को : रशियाचे (Russia) अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) जबाबदार नेते असल्याचं मत व्यक्त केलंय. तसेच दोन्ही नेते भारत-चीन प्रश्न (India-China Issue) सोडवण्यासाठी सक्षम असल्याचं त्यांनी नमूद केलं. विशेष म्हणजे पुतिन यांनी भारत-चीन प्रश्नात तिसऱ्या देशाने हस्तक्षेप करायला नको असंही स्पष्ट केलंय. ते मागील अनेक दिवसांपासून भारत-चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना बोलत होते (Russia President Vladimir Putin praise Indian PM Narendra Modi India-China Issue).

रशियाने भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या सहभागातून तयार झालेल्या क्वाड (Quad) मंचावर टीका केलीय. व्लादिमीर पुतिन म्हणाले, “कोणता देश कुणासोबत आघाडी करतो आहे किंवा कोणत्या देशाने कुणासोबत मैत्री करावी यावर बोलण्याची जबाबदारी रशियाची नाही. मात्र, एखाद्या देशाविरुद्ध कोणतीही आघाडी तयार करायला नको.” पुतिन यांना चीनविरुद्धच्या क्वाड मंचात भारताच्या सहभागावर विचारले असता त्यांनी हे उत्तर दिलं.

“शेजारी देशांमध्ये वादग्रस्त मुद्दे असतात, भारत-चीनचे मुद्दे ते स्वतः सोडवतील”

“भारतासोबत रशियाची भागेदारी असल्यानं रशिया आणि चीनच्या संबंधांमध्ये कोणताही विरोधाभास नाही. भारत आणि चीनमध्ये काही वादाचे मुद्दे आहेत हे मला माहिती आहे. मात्र, शेजारी देशांमध्ये नेहमीच असे वादग्रस्त मुद्दे असतात. मी भारताचे पंतप्रधान आणि चीनचे अध्यक्ष दोघांनाही चांगल्या प्रकारे ओळखतो. ते जबाबदार लोक आहेत आणि प्रामाणिकपणे एकमेकांचा सन्मान करतात. त्यांना आत्ता सामना करावा लागत असलेल्या प्रश्नांवर ते उत्तर शोधतील असा मला विश्वास आहे. मात्र, इतर कोणत्याही तिसऱ्या देशाने यात हस्तक्षेप करु नये हे आवश्यक आहे.”

सीमेवर भारत-चीनमध्ये तणाव

भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाख सीमेवर एक वर्षापासून अधिक काळा झाला तसा तणाव आहे. या तणावातूनच 45 वर्षांमध्ये पहिल्यांदा दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये झडप झाली. यात दोन्हीकडील सैनिकांचा मृत्यू झाला. पँगोंग तलाव परिसातील तणाव कमी करण्याबाबत काही प्रगती नक्कीच झालीय. मात्र, अद्यापही तणाव आहे. याशिवाय प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरही (LAC) तणाव आहे. हा तणाव कमी करण्यासाठी बैठकही आयोजित करण्यात आली. मात्र, अद्याप यावर तोडगा निघालेला नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area