ना व्हेंटिलेटर, ना अद्यावत सुविधा, शिकाऊ डॉक्टरांमुळे 87 रुग्णांचा मृत्यू, सांगलीत रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टरला अटक

 सांगली : कोरोना उपचारादरम्यान 87 रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मिरजेच्या अ‍ॅपेक्स हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टराला अटक करण्यात आली आहे. महेश जाधव असे या डॉक्टराचे नाव आहे. त्याच्यावर महात्मा गांधी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. (Miraj Apex Hospital chief doctor Arrested by Sangli police for Causing death of 87 corona patients)

नेमकं प्रकरण काय?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उपचारासाठी मिरजेतील अ‍ॅपेक्स हॉस्पिटल कोविड सेंटरला परवानगी देण्यात आली होती. मात्र गेल्या महिन्यात या रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होऊन त्यांच्या मृत्यूस झाल्याचा प्रकार समोर आला होता. तसेच अनेक रुग्णांकडून अधिक बिलं आकारल्याची माहितीही समोर आली होती.

याप्रकरणी वाढत्या तक्रारीनंतर सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी हॉस्पिटलवर कारवाई केली होती. त्यानंतर सांगली महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यावेळी रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर महेश जाधव यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


पोलिसांकडून सखोल तपास

या प्रकरणाचा तपास करत असताना रुग्णालयांमध्ये 205 रूग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यापैकी 87 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. तर रुग्णालय प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रातील त्रुटी असल्याचे दिसत होते. यामुळे महात्मा गांधी चौक पोलिसांकडून सखोल तपास करण्यात आला. ज्यात काही धक्कादायक माहिती समोर आली.

रुग्णालयात कोरोना नियमावलीप्रमाणे उपचारच नाहीत

सांगलीतील मिरजेच्या अ‍ॅपेक्स रुग्णालयात कोरोना नियमावलीप्रमाणे उपचार करण्यात आले नाहीत. कोणत्याही प्रकारचे व्हेंटिलेटरची आणि अद्यावत अशी सुविधा उपलब्ध नव्हती. मात्र तरीदेखील अनेक रुग्णांवर उपचार करण्यात आले. याशिवाय शिकाऊ डॉक्टरांच्या निगराणीखाली हे सगळे उपचार करण्यात येत होते. त्यामुळे अनेक रुग्णांना त्यांचा जीव गमवावा लागल्याची बाब पोलिस तपासात निष्पन्न झाली.

त्यानंतर महात्मा गांधी चौक पोलिसांनी डॉक्टर महेश जाधव यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्याकडे पसार होणार्‍या डॉक्टर महेश जाधव याला कासेगाव याठिकाणी ताब्यात घेऊन अटक केली आहे. (Miraj Apex Hospital chief doctor Arrested by Sangli police for Causing death of 87 corona patients)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area