पाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ अयशस्वी, इम्रान खान यांचं तोंड ‘आंबट’च राहिलं, काश्मिर प्रश्नावरुन सामनातून टीका

 मुंबई : आजच्या सामना अग्रलेखातून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा काश्मिरप्रश्नावरुन जोरदार समाचार घेण्यात आलाय. पाकिस्तानची ‘मँगो डिप्लोमसी’ही अयशस्वी ठरली आणि त्यामुळे इम्रान खान यांचे तोंड ‘आंबट’च राहिले. तसंच अमेरिकेची इच्छा आणि संकल्प यानुसार काश्मिर प्रश्न सुटावा या पाकच्या साक्षात्काराला ‘इम्रान खान के हसीन सपने’ यापेक्षा वेगळे काय म्हणता येईल?, असा सणसणीत टोलाही लगावण्यात आलाय. (Sanjay Raut Saamana Editorial Over Kashmir Conflict)

पाकिस्तान सध्या राजकीय, आर्थिक, सामाजिक अराजकाच्या खाईत सापडला आहे. कर्जाच्या प्रचंड बोजाखाली दबला गेला आहे. जागतिक स्तरावर त्याची पत प्रचंड खालावली आहे. ती सावरण्यासाठी इम्रान खान यांनी केलेली ‘मँगो डिप्लोमसी’ही अयशस्वी ठरली आणि त्यामुळे इम्रान खान यांचे तोंड ‘आंबट’च राहिले. त्यात आता पाकिस्तानकडील अण्वस्त्र सामर्थ्याचा मुद्दा समोर आला आहे. अशा वेळी इम्रान खान यांनी कश्मीरची ढाल पुढे करणे अपेक्षितच होते. पण हिंदुस्थानसाठी काश्मिर हा प्रश्न कुठे आहे?, असा सामनातून म्हटलं आहे.

काश्मिरविषयी अमेरिकेसारख्या तिसऱ्या देशाचा संबंध येतोच कोठे?

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अचानक कश्मीर प्रश्नाची उबळ आली आहे. कश्मीर प्रश्न सुटला तर अण्वस्त्रांची गरजच उरणार नाही, असा साक्षात्कार इम्रान यांना झाला आहे. अर्थात, त्यातही त्यांचे वाकडे शेपूट वळवळलेच आहे. नेहमीप्रमाणे इम्रान यांनी त्यात अमेरिकेचे नाक ओढूनताणून खुपसलेच आहे. अमेरिकेची इच्छा असेल आणि त्यांनी संकल्प केला तर कश्मीर प्रश्न सुटू शकतो, असे इम्रान महाशय म्हणाले आहेत. मुळात कश्मीरविषयी अमेरिकेसारख्या तिसऱ्या देशाचा संबंध येतोच कोठे?

अमेरिका जागतिक महासत्ता असेल पण…

अमेरिका जागतिक महासत्ता वगैरे असेलही, पण म्हणून कश्मीरबाबत मध्यस्थी करण्याचा अधिकार तिला आहे असे होत नाही. खरे म्हणजे कश्मीर हा हिंदुस्थानसाठी मुद्दाच नाही. त्यामुळे तो ‘प्रश्न’ वगैरे देखील नाही. तरी पाकिस्तानकडून नेहमीच कश्मीरबाबत ‘तिसऱ्या’च्या मध्यस्थीची वकिली केली जात असते. अमेरिकेच्या अनेक अध्यक्षांनी यापूर्वी वरकरणी का होईना, तटस्थ भूमिका घेतली आहे. भले ते त्यांचे दाखवायचे दात असतील, पण तशी जाहीर भूमिका त्यांना घ्यावी लागली आहे. मात्र तरीही पाकिस्तानचे अमेरिकेच्या मध्यस्थीचे तुणतुणे थांबलेले नाही.

पाकिस्तानला अणवस्त्र वाढवायची आहेत

पाकिस्तानला एकीकडे अमेरिकेची आरती ओवाळायची आहे आणि दुसरीकडे पाकिस्तानदेखील कसा अण्वस्त्रसंपन्न वगैरे आहे याविषयी बढाई मारायची आहे. पाकिस्तानच्या शस्त्रसाठ्यात सध्या 165 अण्वस्रे असल्याची माहिती अलीकडेच समोर आली आहे. पुन्हा त्यांची संख्या वाढविण्याची पाकिस्तानची इच्छाही लपून राहिलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर इम्रान यांना कश्मीर प्रश्नाची आठवण झाली, हे लक्षात घ्यायला हवे. तो सोडविण्याचा राग आळवत त्यांनी पाकिस्तानकडील अण्वस्त्रांचे आणि ते वाढविण्याच्या त्यांच्या अधिकाराचे अप्रत्यक्ष समर्थन केले आहे.

इम्रान खान यांच्याकडून ‘गरजे’पोटी कश्मीरची ढाल पुढे

पुन्हा अमेरिकेने डोळे वटारू नयेत यासाठी अमेरिकेची इच्छा आणि संकल्पाच्या तारादेखील छेडल्या आहेत. पाकड्यांचे हे पूर्वापार राजकीय आणि लष्करी धोरण आहे. तेथे राष्ट्रप्रमुख किंवा लष्करप्रमुख कोणीही असला तरी या धोरणात बदल होत नाही. कारण ‘कश्मीर’ ही पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्करशहा यांच्यासाठी सोयीनुसार वापरता येणारी ढाल आहे. पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांनीही त्याच ‘गरजे’पोटी कश्मीरची ढाल पुढे केली आहे. सहा महिन्यांपूर्वीही त्यांनी कश्मीर प्रश्नावर तोडगा काढला पाहिजे, असे म्हटले होते. आता पुन्हा त्यांना या प्रश्नाचा ‘कळवळा’ आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area