ही तर हद्दच झाली ! चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच उखडून नेलं, सीसीटीव्ही यंत्रणाही गायब

 

यवतमाळ : एटीएम फोडीच्या घटना आपण बऱ्याचदा ऐकल्या आहेत. चोरट्यांनी मोठमोठ्या शस्त्रांनी एटीएम मशीन फोडून पैसे चोरल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. विशेष म्हणजे अशा चोरीच्या घटनांमध्ये एखादा सुरक्षा रक्षकही जखमी होत असल्याच्या बातम्या आपण ऐकल्या किंवा वाचल्या असतील. मात्र, यवतमाळमध्ये तर त्याहीपेक्षा भयानक आणि विचित्र घटना घडली आहे. यवतमाळमध्ये चोरट्यांनी एटीएमची कोणतीही तोडफोड न करताच सहजपणे एटीएम चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे आरोपींनी सीसीटीव्ही यंत्रणादेखील चोरली असल्याची माहिती समोर आली आहे (Thieves steal ATM machine in Yavatmal).

कुठलीही तोडफोड न करता एटीएमची चोरी

यवतमाळ जिल्ह्यातील महागांव शहरातील प्रभाग 1 मध्ये ‘इंडिया वन’ या बंगळुरुच्या कंपनीचे एटीएम सहा महिन्यांपासून सुरू करण्यात आले होते. पण गुरुवारी (10 जून) रात्री पावसाचा फायदा घेत चोरट्यांनी एटीएम मशीनच चोरुन नेलं. विशेष म्हणजे चोरट्यांनी कुठलीही तोडफोड न करता सहजरित्या चोरून नेल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या चोरीकरता चाब्यांचा वापरसुध्दा करण्यात आल्याचे आढळून आले आहे (Thieves steal ATM machine in Yavatmal).

पोलिसांपुढे मोठं आव्हान

चोरीच्या घटनेच्या दोन दिवसांआधीच एटीएममध्ये 5 लाख रुपये टाकण्यात आले होते, अशी माहिती आता समोर आली आहे. चोरट्यांनी नेमके किती रुपये पळवून नेले याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महागांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास चव्हाण आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू हे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच श्वान पथकासही घटनास्थळी दाखल करण्यात आलं. चोरांना पकडणं पोलिसांपुढे मोठं आव्हान आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area