आम्ही निवडणूक आयोगाला मनुष्यबळ देणार नाही, काय करायचं ते करा : विजय वडेट्टीवार

                                               

नागपूर : मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कोरोना काळात निवडणूक घेण्यावरुन निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच या निवडणुकांमुळे कोरोना वाढला तर याला निवडणूक आयोगाला जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केलीय. याशिवाय त्यांनी राज्य सरकार निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्यासाठी मनुष्यबळ देणार नसल्याचंही सांगितलंय. या विरोधात निवडणूक आयोगाला काय करायचं ते करावं, असंही आव्हान त्यांनी दिलं (Vijay Wadettiwar demand FIR against EC for Election amid Corona).

“कोरोना वाढला तर निवडणूक आयोगाला जबाबदार धरुन गुन्हे दाखल करा”

विजय वडेट्टीवार म्हणाले, “कोरोना असल्यानं राज्य सरकार निवडणूक आयोगाला मनुष्यबळ देणार नाही. काय करायचं ते करा. कुठुन आणणार मणुष्यबळ, युपीवरुन का? काय होईल ते होऊ द्या, तुरुंगात गेलो तर जमानत घ्यायला या. निवडणुका झाल्या, कोरोना वाढला तर निवडणूक आयोगाला जबाबदार धरा. गरज भासल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. हे मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे.”

“मी गोपीनाथ मुंडे यांचा शिष्य, पंकजा मुंडे आणि मी गुरुबंधू”

“मी गोपीनाथ मुंडे यांचा शिष्य आहे. पंकजा मुंडे आणि मी गुरुबंधू आहे. ओबीसींवर अन्याय झालाय. तुम्ही आम्ही एकत्र आलो तर हा अन्याय दूर होईल. प्रस्थापितांच्या विरोधात लढणे सोपं नाही. विरोधी पक्ष नेता होतो. ओबीसीचं नेतृत्व करतो. मला वाटलं महसूल खातं मिळेल, पण हे खातं भेटले. कारण मी ओबीसी आहे पंकजा मुंडे यांनाही ग्रामविकास खातं भेटलं होतं,” असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

तसेच बावनकुळे साहेब, माझा नेता ओबीसी आहे, त्यामुळे मला तिकीटाची भिती नाही. मी समाजासाठी झुकायला आणि वाकायला तयार आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

“आपलं अडले, तर सगळ्यांनाच बाप म्हणावं लागतं, वेळ आली तर पंतप्रधानांच्या पाया पडू”

“मला रोज धमक्या येतात, त्या टोकाच्या येतात. धमक्या देणाऱ्यांनो, आम्ही तुमच्या विरोधात नाही आणि राहणारंही नाही. माझं काय होईल ते होईल, पण ओबीसींच्या मुद्यावर मी शांत बसणार नाही. आपलं अडले, तर सगळ्यांनाच बाप म्हणावं लागतं. फडणवीस साहेबांना घेऊन जाऊ. वेळ पडली तर पंतप्रधानांच्या पाया पडू. या आठवड्यात आयोगाला पत्रव्यवहार करु, त्यांना डाटा गोळा करायला हवं ते देऊ,” असंही त्यांनी नमूद केलं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area