पुण्याच्या नामांकित चितळे दुधात काळा खडा, महिलेकडून बदनामीची धमकी, 20 लाखांच्या खंडणीची मागणी

पुणे : चितळे दुधात काळा पदार्थ आढळल्याचं सांगून, बदनामीची धमकी देऊन 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात चितळे उद्योग समूहाकडून वेगवेगळ्या पदार्थांचे उत्पादन केलं जातं. चितळे उद्योग समूह हा पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात मोठा आणि प्रख्यात आहे. चितळे भाकरवडी ही सर्वश्रूत आहे. तसेच चितळे उद्योग समूहाचं पॅकेटच्या पिशव्याचं दूध देखील पुण्यात प्रसिद्ध आहे. मात्र, चितळे कंपनीच्या दुधाच्या पिशवीत काळा पदार्थ आढळल्याचं सांगून काही जणांकडून दूध डेअरली लुबाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. याप्रकरणी पोलिसांनी एका शिक्षिकेसह चार जणांना अटक केली आहे. तसेच बिबवेवाडी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Woman threatens defamation to Chitale Dairy).

काही आरोपींविरोधात याआधी देखील गुन्हे दाखल

गुन्हे शाखेच्या युनीट एच्या पथकाने संबंधित कारवाई केली. पोलिसांनी पुनम सुनील परदेशी (वय 27), सुनील बेनी परदेशी (वय 49), करण सुनील परदेशी (वय 22), अक्षय मनोज कार्तिक (वय 30) या चौघांना अटक केली. विशेष म्हणजे आरोपी कार्तिक विरुद्ध यापूर्वी वानवडी, मुंढवा पोलीस ठाण्यात मारामारी, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. सुनील आणि करण यांच्याविरुद्धही याआधीह गुन्हे दाखल आहेत (Woman threatens defamation to Chitale Dairy).

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पुनम परदेशी ही महिला एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहे. तिच्या घरी येणाऱ्या दुधामध्ये काळ्या रंगाचा पदार्थ आढळून आला. त्यामुळे तिने दुधात भेसळ करण्यात आली असल्याचा तसेच दूध खराब असल्याचा ईमेल 2 जून रोजी दुग्ध व्यावसायिकाच्या ग्राहकाच्या तक्रार निवारण केंद्राकडे पाठवला. चितळे दूध डेअरीच्या प्रतिनिधींनी ही तक्रार नोंदवून घेतली. मात्र, त्यानंतर या तक्रारीच्या आधारे आरोपींनी संबंधितांना त्रास देण्यास सुरुवात केली. कधी फोन करून किंवा कधी प्रत्यक्ष भेटून आरोपी कंपनीच्या प्रतिनिधींना धमकावत होते.

अखेर डेअरीच्या प्रतिनिधींची पोलीस ठाण्यात तक्रार

“तुमच्याविरोधात अन्न आणि औषध प्रशासन विभाग (एफडीए) आणि पोलिसांकडे तक्रार करते, तुमची शहरातील दुकाने बंद करून, तुमची बदनामी करू,” अशी धमकी आरोपी महिलेने मेलच्या माध्यमातून दिली. या घटनेनंतर त्या महिलेनं दूग्ध विक्री व्यावसायिकाकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. अखेर डोक्यावरुन पाणी जात असल्याने याप्रकरणी दुग्ध विक्री कंपनीचे सहाय्यक विपणन प्रतिनिधी नामदेव बाबुराव पवार (वय 62) यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दिली.

पोलिसांकडून आरोपींना अटक

नामदेव पवार यांच्या तक्रारीनंतर पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांनी या प्रकरणाचा तत्काळ तपास करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, अजय थोरात, अमोल पवार यांच्या पथकाने सापळा रचून पुनम, तिचे वडील, भाऊ करण आणि बहीणीचा पती कार्तिक यांना पकडले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area