पॅरोलवर असताना रचला खुनाचा कट


पुणेः गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार सौरभ उर्फ चिम्या चौधरी आणि नीलेश मधुकर आरते या दोघांनी पॅरोल रजेवर असताना कट रचून आखाडे यांचा खून केला. खून करण्यासाठी सौरभ याने नीलेश याला अल्पवयीन मुलाचा वापर करण्यास सांगितले. त्यानुसार अल्पवयीन मुलाला हाताशी धरून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी रविवारी नीलेश आरतेला अटक केली असून, संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. कोर्टाने आरतेला २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पूर्वी अटक केलेले आरोपी बाळासाहेब खेडेकर (वय ५६), निखिल खेडेकर (वय २४), सौरभ चौधरी (वय २१), अक्षय दाभाडे (वय २७) करण खडसे (वय २१), प्रथमेश कोलते (वय २३), गणेश माने (वय २०) आणि निखिल चौधरी (वय २०, सर्व रा. हवेली) यांच्या पोलिस कोठडीतही वाढ केली आहे. याबाबत संतोष आखाडे यांनी फिर्याद दिली आहे. खुनाची घटना १८ जुलै रोजी रात्री उरुळी कांचन परिसरात घडली होती.

खुनाच्या घटनेनंतर नीलेश आरते फरारी झाला होता. पोलिसांनी नगर, लातूर, अहमदपूर येथे शोध घेऊन त्याला अटक केली. नीलेश आणि सौरभ यांची येरवडा कारागृहात ओळख झाली होती. पॅरोलवर सुटल्यानंतर त्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहून खुनाचा कट रचला. घराच्या झडतीत येरवडा कारागृहातील आरोपीने लिहिलेले पत्र मिळाले असून, त्यामध्ये आणखी एक मोठे कांड करण्याचा उल्लेख आहे, अशी माहिती सरकारी वकील संजय दीक्षित यांनी कोर्टाला दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area