धावत येऊन पुलावर पाकीट-मोबाईल ठेवलं, नंतर नदीत उडी घेत युवकाची आत्महत्या

 अकोला : नदीच्या पुलावरुन उडी घेत एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात उघडकीस आली आहे. धावत येऊन युवकाने पुलावर आपले ओळखपत्र, पाकीट आणि मोबाईल ठेवले. त्यानंतर कोणाला काही समजण्याच्या आतच त्याने पूर्णा नदीत उडी घेतली. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

अजय काटोले असे आत्महत्या केलेल्या 35 वर्षीय युवकाचे नाव आहे. तो अकोला शहरातल्या उमरी भागात राहत होता. अकोला जिल्हातल्या पूर्णा नदीच्या पुलावरुन उडी मारत त्याने आत्महत्या केली. अजय पुलावर पळत आला. आपले ओळखपत्र, पाकीट आणि मोबाईल ठेऊन काही कळायच्या आतच त्याने पुलावरुन उडी घेतली, अशी माहिती तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली.

नदीला भरपूर पाणी असल्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेला आणि वर परत आलाच नाही, असंही उपस्थितांनी सांगितलं. घरगुती वादातून अजय काटोले याने आत्महत्या केल्याची चर्चा यावेळी होती, मात्र नेमकं काय कारण आहे, याचा तपास दहीहंडा पोलिस करत आहेत.

वसईत विवाहितेची आत्महत्या

दुसरीकडे, सर्व कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात सापडले. त्यात पतीची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे हतबल होऊन वसईत पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईच्या मर्सेस गावात मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे. स्मिता डिसिल्वा (वय 35) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.

काय घडलं होतं?

स्मिताचे पती विवेक डिसिल्वा (वय 39) काही दिवसांपूर्वी परराज्यात जाऊन आले होते. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती. याच वेळी सासू सासऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली. सर्वांना वसईच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र या उपचारा दरम्यान पतीची प्रकृती चिंताजनक होत चालली होती. त्यामुळे आता कसे होणार, या धास्तीने पत्नीने मंगळवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पत्नीने एक सुसाईड नोट लिहून आपल्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये असे लिहून ठेवले असल्याचेही समोर आले आहे. वसई पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area