कोल्हापूर : जिल्ह्यातील व शहरातील रूग्णसंख्या सातत्याने कमी होत असुनही सरकारने व्यापार सुरू करायला परवानगी न दिल्याने व्यापार्यांचा अपेक्षाभंग झाला आहे, त्यामुळे व्यापारी अत्यंत संतप्त असल्याची माहीती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री चे वरीष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. (Angry traders in Kolhapur are preparing for the agitation)
शासन व प्रशासनाच्या सर्व स्तरांवर सर्व सनदशीर मार्गाने आमच्या व्यथा मांडुनही सरकारने निर्णय न घेणे व्यापार्यांवर अन्याय आहे. बुधवारच्या कॅबिनेट मिटींगमध्ये अनुकूल निर्णय होण्याची अपेक्षा होती. पण व्यापार्यांच्या पदरी निराशा आली असून व्यापार्यांच्या भावनांचा उद्रेक होऊन विस्फोट होण्यापूर्वी सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा व्यापारी टोकाची भूमिका घेतील असा इशाराही गांधी यांनी दिला.
व्यापार्यांची निर्णायक भूमिका जाहीर करण्यासाठी शुक्रवार १६ जुलै रोजी राजारामपुरी येथे कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार्यांची व्यापक बैठक होणार आहे.
करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. परंतु तिसरी लाट येईल म्हणून व्यापार किती काळ बंद ठेवणार? कोणताही शास्त्रीय आधार नसलेला तोडका मोडका लॉकडाऊन करोनावर नाही तर व्यापारी व कर्मचार्यांच्या कुटुंबावर आघात करत आहे. व्यापारी आवश्यक ती खबरदारी घेतील. लसीकरण करून घेत आहेत. आता आणखी वाट बघणे शक्य नाही म्हणुन ताबडतोब परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी गांधी यांनी केली.