तालिबानी ठाकरे सरकारचं अभिनंदन, नो बॉलवर विकेट काढणाऱ्यांना सभागृहाबाहेर पळता भुई थोडी करेल : आशिष शेलार

 


मुंबई : विधीमंडळात सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की, शिवीगाळ होऊन झालेल्या गोंधळानंतर भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबनाची कारवाई झाली. यात भाजप आमदार आशिष शेलार यांचाही समावेश आहे. त्यामुळे कारवाईनंतर आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय. “आज सभागृहात जी घटना घडली आणि जी शिक्षा सुनावण्यात आली ते पाहून तालिबानी संस्कृतीलाही लाजवेल असे नवे तालिबानी ठाकरे सरकारमध्ये आलेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपात नवे तालिबानी महाराष्ट्रात राज्य करु पाहत आहेत. याचा मी जाहीर निषेध करतो,” असं मत आशिष शेलार यांनी व्यक्त केलं .

“मी स्वतः किंवा पक्षाच्या कुठल्याही सदस्याने भास्कर जाधव काय किंवा कुणालाही शिवी दिलेली नाही. आमचे काही सदस्य पिठासीन अधिकाऱ्याजवळ गेले होते, त्यांना मी खाली खेचून आणले. हे समस्त व्हिडीओ लॅब्ररी आणि प्रेस गॅलरीने पाहिलंय,” असंही शेलार यांनी नमूद केलं.

“शिवी देणारे सदस्य भाजपचे नाही, तसं वाटत असेल तर मी क्षमा मागितली”

आशिष शेलार म्हणाले, “ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलू न दिल्यामुळे संवैधानिक त्रागा व्यक्त करणाऱ्या आमच्या सदस्यांना मी जागेवर बसवण्याचं काम केलं. उपाध्यक्ष म्हणजे अध्यक्षांच्या दालनात शिवी देणारे सदस्य भाजपचे नव्हते, तरीही तालिका सभापती भास्कर जाधव यांना ती शिवी आम्ही दिली असं वाटत असेल तर मी तुमची क्षमा मागतो, हे मी त्यांना म्हणालो. त्यानंतर स्वतः तालिका अध्यक्षांनी तालिकेवर बसूनही पक्षाच्या वतीने क्षमा मागितली हे मान्य केलं”.

“मी पंतप्रधानांच्या सन्मानाची लढाई लढतोय”

“छगन भूजबळ यांनी मांडलेल्या ओबीसींना आरक्षणापासून दूर करण्याच्या भूमिकेला मी हरकतीचा मुद्दा म्हणून मी 10 मिनिटं भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना चुकीचं कोट करण्यात आलं. त्यांच्यावर लांच्छण लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावर माझी हरकत होती. मी केवळ ओबीसीच्या आरक्षणासाठी हरकतीचा मुद्दा मांडला. मी पंतप्रधानांच्या सन्मानाची लढाई लढतोय. म्हणून मी सदस्यांना शांत करुन, सदस्यांच्या वतीने क्षमा मागून सुद्धा माझ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली,” असं आशिष शेलार यांनी सांगितलं.

“नो बॉलवर विकेट काढणाऱ्यांना सभागृहाबाहेर पळता भुई थोडी करेल”

“तालिबानी ठाकरे सरकारचं खूप खूप अभिनंदन. मात्र, जनतेतील लढाई आशिष शेलार आणि भाजप यापुढे अजून तीव्र करेल. माझा सामना करण्याची ताकद शिवसेनेत नाही. म्हणून नो बॉलवर त्यांनी विकेट काढण्याचा प्रकार केलाय. मी क्रिकेटमधील खेळाडू आहे. मी दोन्ही हाताने बॉलिंग टाकेल आणि सभागृहाबाहेर तुम्हाला पळती भुई करेल हे स्पष्ट करतो,” असा इशाराही शेलार यांनी सरकारला दिला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area